राज्य बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी, पटकावली आठ पदके

  • By admin
  • July 22, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

मुंबई ः नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स सनराईज महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत एकूण ८ पदकांची कमाई केली. या पदकांमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.

हे सर्व खेळाडू ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये चालविण्यात येणाऱ्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत गेली अनेक वर्ष प्रशिक्षण घेत आहेत.

अंडर १९ मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव याने श्रावणी वाळेकर हिच्यासोबत भाग घेत अंतिम फेरीत निधीश मोरे-प्रांजल शिंदे यांचा २१-१७, २१-१० असा सरळ सेट्समध्ये पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. उपांत्य फेरीत त्यांनी यशराज कदम – अनन्या अग्रवाल यांच्यावर २१-१२, २१-८ असा विजय मिळवला. तसेच या गटात सानिध्य एकाडे याने कांस्य पदक पटकावले.

अंडर १९ बॉईज डबल्स गटात आर्यन आणि अर्जुन बिराजदार या जोडीने उत्तम खेळ करत पुन्हा एकवार सुवर्ण पदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्यांनी ओम गवंडी- सनिध्य एकडे या ठाण्याच्या जोडीचा १९-२१, २१-१७, २१-८ असा पराभव केला. ओम आणि सनिध्य यांनी रौप्य पदक मिळवले. याच गटात यश ढेंबरे यानेही कांस्य पदक पटकावले.

अंडर १९ गर्ल्स डबल्स गटात आदिती गावडे हिने युतीका चव्हाण हिच्यासह खेळत उपांत्य फेरीत हित अग्रवाल-सिया वायदंडे यांना २१-६, २१-१५ अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय सर्व प्रशिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला दिले आहे. या यशाबद्दल ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी खेळाडूंचे कौतुक करीत यापुढे देखील खेळाडू अशीच अभिमानास्पद कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

या यशामुळे ठाणे शहराच्या बॅडमिंटन विकास कार्यास मोठी चालना मिळाली आहे असे नमूद करीत क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या या सर्व खेळाडूंना व संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *