
मुंबई ः आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, नागरिक सहाय्य केंद्र-ज्ञानेश्वर विद्यालय व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुरू झालेल्या शालेय मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत मानवा कदम, रुचिता निकाळजे, सुशांत उगळे, सिद्धांत कांबळे यांनी लहान गटात तर अनुराग जुवाटकर, रितू जगताप, यश पोकळे यांनी मोठ्या गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वजिराच्या आक्रमक चालीस घोड्याची उत्तम साथ निर्माण करीत मनवा कदमने वैभवी निळेच्या राजाला नमविले आणि उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला.
वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहात रुचिता निकाळजेने तनु सविताच्या किंगला शह देत मात केली आणि रुचिताने उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य सामन्यात सुशांत उगळेने श्लोक शिंदेचा, सिद्धांत कांबळेने हयत सय्यदचा, अनुराग जुवाटकरने छायांक उघडेचा, रितू जगतापने तन्वी गायकवाडचा, यश पोकळेने अब्दुल आहाडीचा तर फैझ पठाणने विभास जाधवचा पराभव करून विजयीदौड सुरू ठेवली. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी व फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, मुख्याध्यापक महेंद्र पाटील, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांचे स्पर्धेला मार्गदर्शन लाभले आहे.