
लंडन ः भारत महिला आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शानदार शतक ठोकले आहे. तिने फक्त ८२ चेंडूत शतक ठोकून अनेक विक्रम केले. हरमनप्रीतच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याच्या बाबतीत तिने मिताली राजची बरोबरी केली आहे.
हरमनप्रीत कौरने मिताली राजची बरोबरी केली
भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर स्मृती मानधनाचे नाव अव्वल स्थानावर आहे. मानधनाने १०५ डावांमध्ये ११ शतके ठोकली आहेत. या यादीत हरमनप्रीत कौर आणि मिताली राज दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनीही आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७-७ शतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे हरमनप्रीतने १२९ डावांमध्ये ७ शतके ठोकली आहेत. मिताली राजने २११ डावांमध्ये ही कामगिरी केली. त्यानंतर पूनम राऊतचे नाव या यादीत आहे. तिने ७३ डावांमध्ये ३ शतके केली आहेत. तिरुष कामिनीचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. तिने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात ३७ डावांमध्ये २ शतके केली आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जलद शतक झळकावले
भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावण्याबद्दल बोलायचे झाले तर हरमनप्रीत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. तिने २०२५ मध्ये आयर्लंडविरुद्ध ७० चेंडूत शतक पूर्ण केले. या सामन्यात हरमनप्रीतने ८२ चेंडूत शतक झळकावले आहे. यादीत हरमनप्रीत हिचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने ८५ चेंडूत शतक झळकावले.
हरमनप्रीत कौरने आणखी एक कामगिरी केली
या खेळीदरम्यान हरमनप्रीतने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. खरं तर, तिने एकदिवसीय सामन्यात ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. हरमनप्रीत कौर ही ही कामगिरी करणारी जगातील १७ वी महिला खेळाडू आहे. त्याचबरोबर, एकदिवसीय सामन्यात ४००० धावा करणारी ती तिसरी भारतीय आहे. तिच्या आधी मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी ही कामगिरी केली आहे. हरमनप्रीतने १२९ डावांमध्ये हा आकडा ओलांडला आहे.