
बांगलादेश संघाचा आठ धावांनी रोमांचक विजय
ढाका ः पाकिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. सध्या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. टी २० मालिकेचा दुसरा सामना बांगलादेशच्या शेर-ए-नॅशनल स्टेडियम, ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा ८ धावांनी पराभव केला. या पराभवासह पाकिस्तानच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवण्यात आला आहे. पाकिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदाच टी २० मालिकेत पराभव पत्करला आहे. बांगलादेशचा संघ मालिकेत २-० ने आघाडीवर आहे आणि आता तिसरा सामना जिंकून पाकिस्तानचा क्लीन स्वीप करू इच्छितो.
बांगलादेशकडून जाकेर अलीने अर्धशतक झळकावले
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. मोहम्मद नैम ३, कर्णधार लिटन दास ८ आणि परवेझ हसन इमॉन १३ धावा करून बाद झाले. हे तिन्ही फलंदाज काही खास करू शकले नाहीत. तौहिद हृदयॉयला खातेही उघडता आले नाही. सलग विकेट गमावल्यानंतर, मेहदी हसनसह झाकीर अली यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. झाकीरने ५५ आणि मेहदीने ३३ धावा करून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. झाकीर शेवटपर्यंत क्रीजवर राहिला, परंतु दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणतीही साथ मिळाली नाही. शमीम हुसेन १, तंजीम हसन साकिब ७, रिशाद हुसेन ८ आणि शोरीफुल इस्लाम १ धावा करून बाद झाला. २० षटकांत १३३ धावा करून संपूर्ण बांगलादेश संघ ऑलआउट झाला.
फहीम अश्रफची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली
१३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. अर्धा संघ १५ धावांनी पॅव्हेलियनमध्ये परतला होता. फखर जमान ८, सैम अयुब १, सलमान आगा ९ आणि खुशदिल शाह १३ धावा करून बाद झाला. मोहम्मद हरिस, हसन नवाज आणि मोहम्मद नवाज हे तिघेही खेळाडू आपले खातेही उघडू शकले नाहीत. त्यानंतर फहीम अशरफने डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाला १०० च्या पुढे नेले. शेवटच्या ७ चेंडूत १३ धावांची आवश्यकता होती, तेव्हा फहीम ५१ धावा करून बाद झाला. पाकिस्तानचा संघ १९.२ षटकात १२५ धावा करून सर्वबाद झाला. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने सर्वाधिक ३ बळी घेतले. मेहदी हसन आणि तन्झिम हसन सकीब यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.