
नवी दिल्ली ः भारतीय शटलर एचएस प्रणॉय याने पाच मॅच पॉइंट्स वाचवले आणि एका गेम पिछाडीवरून पुनरागमन करत मंगळवारी जपानच्या कोकी वतानाबेला हरवून चायना ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तथापि, लक्ष्य सेन पुन्हा एकदा पहिला अडथळा पार करू शकला नाही.
लक्ष्य पराभूत
जागतिक क्रमवारीत ३५ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने १८ व्या क्रमांकावर असलेल्या वतानाबेविरुद्ध ८-२१, २१-१६, २३-२१ असा विजय मिळवला. लक्ष्यची खराब कामगिरी सुरूच राहिली आणि चांगली सुरुवात असूनही, त्याला पाचव्या मानांकित चीनच्या ली शी फेंगकडून २१-१४, २२-२४, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला.
सामन्यानंतर प्रणॉय म्हणाला की, ‘माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. दौऱ्यावर परतल्याबद्दल मी आनंदी आहे. खेळाचा दर्जा खरोखरच सुधारला आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्हाला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. आता प्रत्येक फेरी जिंकणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पुरुष एकेरीत सरासरी वय अचानक २२-२३ वर्षे झाले आहे. बरेच नवीन चेहरे आहेत आणि त्यांचा खेळ कसा आहे हे तुम्हाला खरोखर माहित नाही. आता अनुभव फारसा महत्त्वाचा नाही.’
पहिल्या गेममध्ये भारतीय खेळाडू जपानी खेळाडूविरुद्ध काहीही करू शकला नाही परंतु दुसऱ्या गेममध्ये त्याने चांगले पुनरागमन केले आणि सामना बरोबरीत आणला. तिसरा आणि निर्णायक गेम खूप रोमांचक होता. शेवटच्या गेममध्ये प्रणॉय २-११ ने पिछाडीवर होता, परंतु नंतर त्याने सलग पाच गुण घेत अंतर कमी केले. तरीही, जपानी खेळाडूचे १५-२० च्या स्कोअरवर पाच मॅच पॉइंट होते. भारतीय खेळाडूने हे सर्व मॅच पॉइंट वाचवले आणि २१-२० ची थोडीशी आघाडी मिळवली आणि अखेर एक संस्मरणीय विजय नोंदवला.
अनुपमाला धक्का
महिला एकेरीत, अनुपमा उपाध्याय पहिल्या फेरीतच चिनी तैपेईच्या लिन सियांग तीकडून २३-२१, ११-२१, १०-२१ असा पराभव पत्करून बाहेर पडली. मिश्र दुहेरीत ए सूर्या आणि ए प्रमुथेश तसेच रोहन कपूर आणि रुत्विका गड्डे या जोडीनेही त्यांच्या पहिल्या फेरीतील सामने गमावले.