
छत्रपती संभाजीनगर ः वेगवान गोलंदाज ओमकार कल्याण पातकळ याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप पाडायला सुरुवात केली आहे. ओमकार हा महाराष्ट्राच्या अंडर १६, अंडर १९ आणि सध्या अंडर २३ संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. विशेष म्हणजे त्याची निवड बीसीसीआय नॅशनल क्रिकेट अकॅडमी (एनसीए) कॅम्पसाठी झाली होती, जे क्रिकेट कारकिर्दीत एक मोठे पाऊल मानले जाते.
ओमकार पातकळ हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, त्याने भारताच्या राष्ट्रीय संघासोबत तसेच अफगाणिस्तान, श्रीलंका व इंग्लंड संघातील आंतरराष्ट्रीय फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. अशा मोठ्या फलंदाजांसमोर नेट्समध्ये सातत्याने गोलंदाजी करून त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर इंग्लंडमधील हिंकले अॅमेच्योर क्रिकेट क्लब तसेच लीसेस्टरशायर आणि रटलँड क्रिकेट लीगच्या २०२५ च्या डिव्हिजन ‘अ’ साठी विदेशी खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्याने आपल्या पहिल्याच टी २० सामन्यात जबरदस्त कामगिरी करत ४ षटकांत केवळ १८ धावा देत ५ बळी घेतले आहेत.
ओमकारचे वडील कल्याण अंकुशराव पातकळ हे सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या शिरपेचात ओमकारने मानाचा तुरा खोवला असून, त्याच्याकडून भविष्यात मोठ्या क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा आहे. याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सीएसी चेअरमन सचिन मुळे, टूर्नामेंट कमेटी चेअरमन राजू काणे यांनी ओमकारचे अभिनंदन केले आहे. ओमकार हा एमजीएम क्रिकेट अकादमीत सराव करत असून त्याला क्रिकेट प्रशिक्षक सागर शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.