
शालेय क्रीडा स्पर्धा नियमांची माहिती देण्यासाठी एम जे महाविद्यालयात शिबिराचे आयोजन
जळगाव ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटनांचा महासंघ, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, एम जे महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांच्यासाठी आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा अद्यायावत नियम शिबीर एम जे महाविद्यालय सभागृहात संपन्न झाले. महाराष्ट्रात प्रथमच क्रीडा विभागातर्फे आयोजित शिबिरात तब्बल ३०० क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला हे विशेष.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे अध्यक्ष आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी खाशाबा जाधव व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलन करून केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद राणे, उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे सचिव डॉ प्रदीप तळवलकर, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, मनभावन रेडिओचे अमोल देशमुख, विभागीय क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जी एस सोसायटीचे संचालक मुख्याध्यापक मंगेश भोईटे, तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनभावन रेडिओ आरजे शुभांगी बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी शिबिर आयोजनाचा हेतू व त्याची गरज यावर सविस्तर माहिती दिली. क्रीडा अधिकारी सचिन निकम व डॉ सुरेश थुरकडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, चंचल माळी व मीनल थोरात, डॉ रणजित पाटील यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे व डॉ श्रीकृष्ण बेलोरकर यांनी क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिबिरात तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. वसीम मिर्झा (ॲथलेटिक्स), जयांशु पोळ (खो-खो), प्रवीण ठाकरे (बुद्धिबळ), संजय पाटील (कुस्ती), डॉ देवेंद्र सोनार (मेडिटेशन), राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी (योगा), प्रशांत कोल्हे (कबड्डी) यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ मीनाक्षी गवळी यांनी भेट देवून योगा विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील सुमारे ३०० क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती. शिबिराचा समारोप जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सहभागी क्रीडा शिक्षक शिबिरार्थीची चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एम जे महाविद्यालय व एकलव्य क्रीडा संकुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.