
अमरावती (डॉ तुषार देशमुख) ः चांदुर बाजार येथे आयोजित जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रतीक उगले आणि देवश्री वडनेरकर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
टेनिस हॉलि्बॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनाच्या पर्वावर व जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा चांदुर बाजार येथे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल संघटना, शिवाजीयंस स्पोर्ट क्लब व जी सी टोम्पे महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन तालुक्यातील एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष गटात मोर्शी येथील प्रतीक उगले याने प्रथम क्रमांक मिळविला.तर महिला गटात करजगांव येथील देवश्री वडनेरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा संयोजक आणि जिल्हा संघटनेचे सदस्य पंकज उईके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शारीरिक शिक्षक संघटनेचे सल्लागार डी आर नांदूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे सहसचिव किरण सोनार, स्पर्धेचे संयोजक आणि जिल्हा संघटनेचे सचिव डॉ तुषार देशमुख, जिल्हा संघटना सदस्य सुधीर राहाटे, प्रतीक देशमुख, प्रतीक उगले, सौरभ चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.