
मुंबई ः अडसूळ ट्रस्ट शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विराज हावळे, ऋषिकेश लोंढे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, नागरिक सहाय्य केंद्र-ज्ञानेश्वर विद्यालय व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे झालेल्या शालेय मुला-मुलींच्या मोफत बुद्धिबळ स्पर्धेत लहान गटात ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विराज हावळे याने तर मोठ्या गटात महिला मंडळ माध्यमिक शाळा-कुर्ल्याच्या ऋषिकेश लोंढे याने विजेतेपद पटकाविले. विराज हावळे याने क्वीन व हत्तीच्या सहाय्याने सुशांत उघडेच्या राजाला शह देत प्रथम क्रमांकावर झेप घेतली.
मुख्याध्यापक महेंद्र पाटील व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या १६ स्पर्धकांना पुरस्कारासह गौरविण्यात आले.
शालेय ७६ खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमधील मोठ्या गटात महिला मंडळ शाळेचा ऋषिकेश लोंढे विरुद्ध हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडीचा आरव साहू यामध्ये बुद्धिबळ पटावर विजेतेपदासाठी चुरशीची लढत झाली. अखेर क्वीन व उंटाच्या अचूक चाली रचत ऋषिकेशने आरवच्या राजाला कोंडीत पकडले आणि १९ व्या मिनिटाला शरणागतीसाठी भाग पाडले.
मोठ्या गटात ऋषिकेश लोंढे याने प्रथम, आरव साहूने द्वितीय, फैझ पठाणने तृतीय, यश पोकळेने चतुर्थ आणि लहान गटात विराज हावळेने प्रथम, सुशांत उघडे याने द्वितीय, मनवा कदमने तृतीय, सिध्दांत कांबळेने चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार जिंकला. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी व नामवंत फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक आदींचे खेळाडूंना मोफत मार्गदर्शन लाभले. बुद्धिबळाचा हा उपक्रम पूर्णपणे मोफत साकारल्याबद्दल शिक्षक व पालक वर्गाने आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, नागरिक सहाय्य केंद्र व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले.