
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला खेळाडू, कँडीडेट्स स्पर्धेसाठी पात्र
नवी दिल्ली : भारताची १९ वर्षीय आयएम दिव्या देशमुख हिने फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या शानदार कामगिरीमुळे नागपूरची दिव्या देशमुख २०२६ मध्ये होणाऱ्या महिला कँडीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या गेममध्ये दिव्या देशमुख हिने माजी महिला विश्वविजेत्या टॅन झोंगीविरुद्ध जबरदस्त खेळ केला आणि बाजी जिंकली. पहिला गेम ड्रॉ झाला होता.
दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. विश्वचषकात अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. आयएम दिव्या देशमुखने कॅंडिडेट्स विजेती जीएम टॅन झोंगी हिला २.५-१.५ ने हरवून फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दिव्या देशमुख हिने अंतिम फेरी गाठून भारताच्या वाढत्या बुद्धिबळ प्रतिभेचे शानदार प्रदर्शन केले आहे. आता दिव्या जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे!

दिव्या ही जागतिक युवा विजेती आहे. ९ डिसेंबर २००५ रोजी नागपूर येथे जन्मलेल्या दिव्याने वयाच्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिचे पालक डॉक्टर आहेत. तिच्या वडिलांचे नाव जितेंद्र आणि आईचे नाव नम्रता आहे. दिव्याने २०१२ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी अंडर-७ राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर तिने अंडर-१० (डरबन, २०१४) आणि अंडर-१२ (ब्राझील, २०१७) श्रेणींमध्ये जागतिक युवा विजेतेपदेही जिंकली. त्यानंतर, तिने २०१४ मध्ये डर्बन येथे झालेल्या अंडर-१० जागतिक युवा विजेतेपद आणि २०१७ मध्ये ब्राझीलमध्ये अंडर-१२ श्रेणीतही जिंकले. तिच्या सततच्या प्रगतीमुळे ती २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर बनली आणि यासह ती ही कामगिरी करणारी विदर्भातील पहिली महिला खेळाडू आणि देशातील २२ वी महिला खेळाडू बनली.