
शुक्रवारपासून स्पर्धेला प्रारंभ
मुंबई ः द चेंबूर जिमखान्याच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चौथी चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी ९ वाजता चेंबूर जिमखाना, चेंबूर (पूर्व) येथे सुरु होणार आहे.
या स्पर्धेत राज्यातून पुरुष एकेरी गटात ३९२ तर महिला एकेरी गटात ५० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा २५ ते २७ जुलै २०२५ अशी सलग ३ दिवस चालणार असून दररोज सकाळी ९ वाजता पहिले सत्र सुरू होईल. तर २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून महिला गटांच्या सामन्यांना सुरुवात होईल. पुरुष एकेरीत पुण्याच्या सागर वाघमारे याला प्रथम मानांकन तर यंदाच्या राज्य विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.
महिला एकेरीत प्रथम मानांकन मिळवण्याचा मान यंदाच्या शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिला मिळाला असून ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे. या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही महत्वाच्या सामान्यांचे तसेच उपउपांत्य फेरीपासूनच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येणार असून मराठी, हिंदी व इंग्रजीमधून या समान्यांचे समालोचन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेते तब्बल १ लाख १० हजारांची कमाई करणार आहेत. यंदाच्या मोसमात राज्यातील ही पाचवी स्पर्धा आहे.
स्पर्धेतील मानांकन
पुरुष एकेरी : १) सागर वाघमारे (पुणे), २) प्रशांत मोरे (मुंबई), ३) झैद अहमद फारुकी (ठाणे), ४) प्रफुल मोरे (मुंबई), ५) समीर महम्मद जाबीर अन्सारी (ठाणे), ६) विकास धारिया (मुंबई), ७) राहुल सोळंकी (मुंबई), ८) अभिजित त्रिपनकर (पुणे).
महिला एकेरी : १) आकांक्षा कदम (रत्नागिरी), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) मिताली पाठक (मुंबई), ४) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ५) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ६) अंबिका हरिथ (मुंबई), ७) रिंकी कुमारी (मुंबई), ८) ऐशा साजिद खान (मुंबई).