
डेरवण ः डेरवण क्रीडा संकुलात सिम्पली स्पोर्ट फाउंडेशन आणि श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने महिला खेळाडू व प्रशिक्षकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२१ ते २३ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या या तीन दिवसीय महिला क्रीडा आरोग्य उपक्रमात विविध उपयुक्त सत्रांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल व फुरुस विद्यालयातील विद्यार्थिनींनी आवर्जून सहभाग नोंदवला होता.

या उपक्रमाकरिता बंगळुरू स्थित फिजिओथेरपीस्ट रितिका पारटे, मानसशास्त्रज्ञ वृषाली चौधरी, पोषण तज्ञ शिफ्रा वराडकर या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, प्रशिक्षक विनायक पवार, प्रतीक्षा पेंढारी, सागर साळवी, अविनाश पवार, शावजीराव लक्ष्मणराव निकम, फुरुस विद्यालयाच्या शिक्षिका मुग्धा टेंबे उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक उदयराज कळंबे यांचे सहकार्य लाभले.
महिला खेळाडू व प्रशिक्षकांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या कार्यशाळेत आरोग्य विषयक अडचणी, पोषणविषयक मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य या तीन महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रांचे उद्दिष्ट महिला खेळाडूंच्या कामगिरीत आणि क्रीडा गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवणे हे आहे.
शिबिरातील उपस्थित विद्यार्थिनींनी आपले अनुभव, शंका व प्रश्न मोकळेपणाने मांडले. आजच्या बदलत्या क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी त्यांचे संपूर्ण आरोग्य, पोषण आणि मानसिक संतुलन टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. या उपक्रमामुळे खेळाडू विद्यार्थिनींमध्ये आपल्या शरीराच्या व मानसिकतेच्या बदलांबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करण्याची सवय लागेल, असे मनोगत फुरुस विद्यालयाच्या शिक्षिका मुग्धा टेंबे यांनी व्यक्त केले.