सोलापूर ः महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना पुरस्कृत व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेच्या अधिपत्याखाली वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेस २५ जुलैपासून सोलापुरात सुरुवात होणार आहे.
कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलातील एमएसएलटीए टेनिस सेंटर व इलिझियम क्लबच्या मैदानावर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत ३१ जुलैपर्यंत होणार आहेत. पुरुषांच्या, महिलांच्या एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या प्रकारात या स्पर्धा होतील. या स्पर्धेत ३५ ते ८० वर्षांपुढील पुरुष तर ३० ते ५० वर्षांपुढील महिला सहभागी होणार आहेत. देशातून १७५ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने केले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या पिण्याच्या पाण्याची सोय स्पेनका कंपनीने केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता आमदार देवेंद्र कोठे व जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते होईल.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने पर्यवेक्षक म्हणून पुण्याच्या वैशाली शेकटकर यांची तर स्पर्धा संचालक म्हणून मुंबईच्या डोसा रामाराव यांची तर एमएसएलटीएचे संयुक्त मानद सचिव राजीव देसाई यांच्यावर स्पर्धा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली आहे. स्पर्धेतील खेळाडूना आंतरराष्ट्रीय गुण मिळणार असून यामुळे त्यांना जागतिक क्रमवारीत आगेकूच करण्यासाठी मदत होणार आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज माजी भारतीय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी निवड होणार
या स्पर्धेची लोकप्रियता देशभरात दिवसें दिवस वाढत चालली असून जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत १३ जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वयोगटातील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या प्रथम ४ खेळाडूंची पोर्तुगाल येथे जानेवारी २०२६ मधे होणाऱ्या जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली जाणार आहे.