
नवी दिल्ली : भारताची अनुभवी बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आणि रॅपिड वर्ल्ड चॅम्पियन कोनेरू हम्पी आणि भारताची युवा आयएम दिव्या देशमुख यांच्यात महिला जागतिक बुद्धिबळ कपसाठी अंतिम झुंज होणार आहे. भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात प्रथमच भारताचे दोन महिला खेळाडू विजेतेपदासाठी डावपेच लढवणार आहेत. भारताच्या हरिका द्रोणावली हिने तिसरे स्थान मिळवले आहे. कँडीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारताच्या तीन महिला खेेळाडू पात्र ठरल्या आहेत हे विशेष.
कोनेरू हम्पी हिने उपांत्य फेरीत चीनच्या ली टिंगजी हिला विस्तारित टायब्रेकमध्ये ५-३ असे हरवून अंतिम फेरीत धडक मारली. आता तिचा सामना भारताच्या दिव्या देशमुखसोबत होणार आहे. कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील अंतिम सामना म्हणजे विजेतेपद आणि उपविजेतेपद भारताकडेच राहणार आहे. डी गुकेश याच्यानंतर महिला गटाचे विश्वविजेतेपद देखील भारतीय खेळाडू पटकावणार आहे आणि हा काळ म्हणजे भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णकाळ आहे असे म्हणावे लागेल.
१९ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नाफिदाय महिला जागतिक बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या गेममध्ये चीनच्या माजी विश्वविजेत्या झोंगी तानला पराभूत केले आणि मिनी सामना १.५-०.५ असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या प्रक्रियेत, दिव्या उमेदवार स्पर्धेत स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरली. महिला उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे आणि ती स्पर्धा विद्यमान महिला विश्वविजेत्या वेनजुन जू हिचा प्रतिस्पर्धी ठरवेल. विशेष म्हणजे, दिव्या पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी होत आहे.