
क्रॉली, डकेटची आक्रमक फलंदाजी, जखमी पंतचे अर्धशतक, भारत सर्वबाद ३५८
मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत इंग्लंड संघाने दुसऱ्पा दिवसअखेर दोन बाद २२५ धावा फटकावत सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले आहे. झॅक क्रॉली (८४) आणि बेन डकेट (९४) या सलामी जोडीने १६६ धावांची भागीदारी करुन भारताला कसोटीवर पकड बसवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.
भारतीय संघाला ३५८ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने दुसरा दिवसाचा ४६ षटकांचा खेळ गाजवला. बॅझबॉल शैलीची फलंदाजी आज पहावयास मिळाली. क्रॉली याने ११३ चेंडूत ८४ धावा काढल्या. त्याने १३ चौकार व १ षटकार मारला. बेन डकेट याने १०० चेंडूत ९४ धावांची आक्रमक खेळी केली. डकेटने १३ चौकार मारले. जडेजाने क्रॉलीला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अंशुल कंबोज याने डकेटची विकेट घेऊन पहिला कसोटी बळी मिळवला. ऑली पोप (२०) आणि जो रुट (११) ही जोडी खेळत आहेत.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३५८ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारताकडून ऋषभ पंतचा अंगठा तुटला होता. तो काल (बुधवार) ३७ धावांवर रिटायर हर्ट झाला होता. ऋषभ पंतने लंगडा करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले. पंतने ७५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि २ षटकार निघाले. पंत व्यतिरिक्त साई सुदर्शनने ६१ आणि यशस्वी जयस्वालने ५८ धावा केल्या. त्याच वेळी इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ५ बळी घेतले.
ऋषभ पंतने इतिहास रचला
ऋषभ पंतने अंगठ्याला तुटून अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. तो आता इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. इंग्लंडमध्ये हा त्याचा पाचवा अर्धशतक होता. पंतने एमएस धोनी आणि फारुख इंजिनिअरला मागे टाकले आहे. धोनी आणि फारुखने प्रत्येकी चार ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
पहिल्या दिवशी ३७ धावांवर जखमी झालेल्या ऋषभ पंतने ७५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने २० धावा केल्या. शार्दुल ठाकूरने ४१ धावांची आणि वॉशिंग्टन सुंदरने २७ धावांची महत्त्वाची खेळी केली. अंशुल कंबोज ०० धावांवर आणि जसप्रीत बुमराह चार धावांवर बाद झाला.
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ७२ धावांत पाच बळी घेतले. त्याच वेळी जोफ्रा आर्चरने ७३ धावांत तीन भारतीय फलंदाज बाद केले. याशिवाय लियाम डॉसन आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बेन स्टोक्सने कसोटीत एकूण पाचव्यांदा ५ विकेट घेतल्या आहेत. २०१३ मध्ये त्याने इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून त्याने २२९ विकेट घेतल्या आहेत.