
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत १५ वर्षांखालील राज्य फिडे रेटिंग निवड चाचणी स्पर्धा तसेच या बरोबरच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेची तयारी व्हावी या हेतूने आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ संघटनेद्वारे करण्यात आले आहे. स्पर्धेत नाव नोंदणी शाळेद्वारे अथवा वैयक्तिकरित्या पण करता येईल.
आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा रविवारी (२७ जुलै) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धेला रविवारी सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल. ही बुद्धिबळ स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा गटात होणार आहे. मुला-मुलींचे स्वतंत्र गट असणार आहेत. या स्पर्धेसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपला प्रवेश २६ जुलै रोजी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत निश्चित करावा. ऐनवेळेस प्रवेश स्वीकारला जाणार नाही.
ही स्पर्धा फिडे नियमांतर्गत साखळी रॅपिड पद्धतीने (स्विस लीग) घेण्यात येईल. स्पर्धकांच्या संख्येवर आधारित फेऱ्या ठरविल्या जातील. या स्पर्धेसाठी प्रत्येक गटात दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट शाळांना बक्षिस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी हेमेंद्र पटेल (9325228261) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.