
आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात कुलगुरूंचा विद्यार्थ्यांशी संवाद
अमरावती ः कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ’कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे अमरावती येथील डॉ राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) उपस्थित होत्या. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, डॉ राजेंद्र गोडे, महाविद्यालयाचे संचालक डॉ दिलीप गोडे, अधिष्ठाता डॉ सुधा जैन, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राचे समन्वयक सहाय्यक कुलसचिव संदीप राठोड व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यार्थी हेच विद्यापीठाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणे हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. ’कुलगुरु कट्टा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे. या संवादातून आम्हाला विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेता येतात आणि त्यावर योग्य उपाययोजना करता येतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठ सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे.
कानिटकर पुढे म्हणाल्या की, शिक्षण केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नसून, ते तुम्हाला एक चांगला माणूस बनवते, सामाजिक भान देते आणि आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती देते. तुम्ही तुमच्या परिश्रमातून आणि जिद्दीने आपल्या विद्यापीठाचे नाव उंचावाल आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनाल. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या अडचणी समजून त्वरीत अंमलबजावणी करणे शक्य होते. विद्यार्थी व शिक्षकांच्या तक्रारी व सूचना समजून त्यांची दखल विद्यापीठाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ मिलिद निकुंभ यांनी सांगितले की, शिक्षण हे तुम्हाला व्यावसायिकदृष्टया सक्षम बनवते यात शंका नाही, पण त्यासोबतच तुमच्या व्यक्तिमहत्वाचा विकास होणेही तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही आरोग्य क्षेत्रात शिकत आहात, त्यामुळे तुमच्यामध्ये संवेदनशीलता, सहानुभूती आणि सेवाभाव असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रशासनाशी संबंधित काही अडचणी असल्यास त्या थेट प्रशासनास निदर्शनास आणण्याचे आवाहन केले. विद्यापीठ प्रशासन हे विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी आहे. पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ राजेंद्र गोडे आणि महाविद्यालयाचे संचालक डॉ दिलीप गोडे यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण हे केवळ एक करिअर नसून ती एक सेवाभावनेने केली जाणारी तपस्या आहे. तुम्ही आज जे शिक्षण घेत आहात, ते तुम्हाला समाजाची सेवा करण्याची एक अनोखी संधी देत आहे. वैद्यकीय क्षेत्रात सतत नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान येत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन गोष्टी सतत शिकत राहणे आणि आपले ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात अनेक आव्हाने येऊ शकतात, याची जाणीव तुम्हांला असायला हवी, तुम्ही या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्टया तयार असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूृत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच संदीप राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना ’दैनंदिन जीवनातील सकारात्मकतेचे फायदे’ या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ श्रीमती मानसी हिरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच समर इंटर्नशिप प्रोग्राम याबाबत सहाय्यक कुलसचिव संदीप राठोड यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्याच्या हेतूने कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू रोपट्याला जलार्पण केले.
या कार्यक्रमास अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या जिल्हयातील संलग्नित महाविद्यालयातील दोनशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अधिसभा सदस्य डॉ राजीव मुदांने, राजेंद्र महाजन, विद्यापरिषद सदस्य डॉ राजेश गोंधळेकर, डॉ सचिन खत्री, डॉ योगेश गोडे, डॉ संजय नेहे, डॉ विवेक भोसले, डॉ जयंती देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अविनाश सोनवणे, श्रीमती मानसी हिरे, अर्जुन नागलोत, पुष्कर तऱहाळ, कृष्णा भवर, सोहम वान्हेरे, शिवम आभाळे यांनी परिश्रम घेतले.