< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); ‘वाद राज्य संघटनेत, समिती जिल्ह्यात-सत्ता संघर्ष’ – Sport Splus

‘वाद राज्य संघटनेत, समिती जिल्ह्यात-सत्ता संघर्ष’

  • By admin
  • July 27, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love
  • भरत कोळी,
    शारीरिक शिक्षण व क्रीडा समन्वयक, शिरपूर.

राज्यात एखादा खेळ वाढविण्यासाठी राज्य क्रीडा संघटनेची फार मोठी भूमिका किंवा जबाबदारी असते. त्यात खेळाबाबत ध्येयधोरणे तयार करणे, नियम, अटी बनविणे, खेळाच्या विकासासाठी जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हा क्रीडा संघटना स्थापन करून त्यांना खेळाचा प्रचार-प्रसारासाठी योग्य ते मार्गदर्शन करून वेळोवेळी संधी देत राहणे ही फार मोठी जवाबदारी राज्य क्रीडा संघटनेची असते. खरंतर जिल्ह्यातील संबंधित खेळामध्ये कार्यरत असलेल्या क्रीडाप्रेमींना व माजी खेळाडूंना हाताशी धरून जिल्ह्यात सदर खेळ कसा वाढेल तेथून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदक विजेते खेळाडू कसे तयार होतील असे हेरणारे कार्यकर्ते शोधून पाठबळ देण्याची गरज असते. खेळाचा योग्य प्रचार व प्रसारासाठी जिल्हा संघटना मैलाचा दगड असतो हे लक्षात घेऊन राज्य संघटना असावी, जिल्हा संघटनांची योग्य ती बांधणी करावी, योग्य लोकांना संधी द्यावी विशेष म्हणजे खेळ जास्तीत-जास्त राजकारणापासून दूर राहील ही काळजी घेणं अपेक्षित असते. 

पण खेळाच्या विकासासाठी आश्रयदाते राजकारणी लागतातंच यात माझं दुमत नाही. पण हस्तक्षेप हा मर्यादित असावा जेणेकरून पदाचे भांडण कोर्टापर्यंत जाणार नाही ही काळजी घेऊन राज्यातून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत. राज्यात तुमच्या खेळाचे जाळे तयार व्हावे, खेळाच्या माध्यमातून सामाजिक विकास होऊन, निरोगी व सुदृढ समाज तयार व्हावा ही दूरदृष्टी ठेवणारी राज्य संघटना असावी. पण हल्ली राज्यातील बॉक्सिंग संघटनेचा तीन-तेरा करणाऱ्या महाशयांचा जाहीर शोक व्यक्त करतो असच म्हणावे. कारण, मागील अनेक वर्षांत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेने ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केले,अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू घडविले, विशेषता इतर राज्य संघटनेनी सुद्धा महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अनुकरण केले इतकं प्रभावी कार्य महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचं होतं, यामुळेचं आमच्या सारखे काही बॉक्सिंगप्रेमी संघटनेला मिळाले ज्यामुळं माझ्या जिल्ह्यात बॉक्सिंग खेळ हा गावागावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये आणि शाळा-शाळांमध्ये वाढवू शकलो याला सर्वस्व असं संपूर्ण पाठबळ हे राज्य संघटनेनी दिलं होतं. त्यांचं कौतुक, राज्य संघटनेच्या दूरदृष्टी भूमिकांमुळे आमच्या जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्तरावर जातील हे वाटत असतांना राज्य संघटनेत पद किंवा आर्थिक बाबींवरून वाद झाला आणि त्याचे पडसाद थेट खेळाडूंवर घातक परिणाम किंवा प्रभाव करणारे दिसले, म्हणजेचं सर्वस्व फटका हा जिल्हा संघटनेत काम करणाऱ्या छोट्या-मोठ्या बॉक्सिंगप्रेमींना बसला.

खेळ कधी कुणासाठी थांबत नाही हे तत्त्व राज्य क्रीडा संघटनांनी लक्षात घ्यावं. खरंतर राज्य क्रीडा संघटना ही स्वतःच्या परिवाराची संपत्ती नसते, ती संपत्ती असते ती खेळाडूंची, त्यांच्या मेहनतीची हे डोक्यात घेऊन कार्य करावं. पण कोरोना काळानंतर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे कारण देत पदासाठी लडाई असा प्रकार सध्या घडवून आणत ३ ते ४ वर्षांपासून खेळाडूंचे प्रचंड नुकसान काही लोकांनी केले, जी बॉक्सिंग संघटना राज्यात सुरळीत चालत होती तिला बंद पाळत बॉक्सिंग चळवळ थांबवली याला कारणीभूत नेमकं कोण आहेत..? याचं आत्मपरीक्षण काही लोकांनी नक्कीचं करावं. धर्मदाय आयुक्त, न्यायालय आदी ठिकाणी जर हे प्रकरण ३ ते ४ वर्षांपासून चालत असेल तर नेमकं बॉक्सिंग संघटनेचं वाटोळं करत आहात की विकास करत आहात याचं उत्तर द्यावं, राज्य संघटना तुमच्या हक्काची मालमत्ता नाही, ती खेळाडूंची मालमत्ता आहे, हे लक्षात असू द्या, कारण तुम्ही राज्य संघटनेचे चालक आहात, मालक नाही. 

कोणतेही कार्य करताना तुम्हाला जिल्हा संघटना आणि तळागळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावेच लागेल. तुम्ही कुठलीही समिती जिल्ह्यावर लादू शकत नाही, स्वतःला हिटलर तर अजिबात राज्य क्रीडा संघटनेने समजू नये जर तुम्हाला खेळाडूंच्या विकासासाठी पद दिले असेल तर त्याप्रमाणे काम करावे उगीचं संघटनेत स्वतःचं कौतुक करण्यासाठी वाद घालू नये. क्रीडा क्षेत्रात हे राष्ट्र प्रबळ उभं रहावं यासाठी राष्ट्रीय व राज्य  संघटनेची महत्वाची जवाबदारी आहे. पण सध्या महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना राजकीय पक्षांचे अनुकरण करतय असं दिसतं. ही कृती अजिबात चांगली नाही. खऱ्या अर्थाने जर जिल्हा संघटनांमध्ये वाद असेल तर राज्य संघटनेचा हस्तक्षेप महत्वाचा ठरतो पण सुडाचे राजकारण करून जिल्हा संघटनांचा सत्यानाश करू नये असं मला वाटतं. 

राज्य संघटनेचे वाद तुमच्या परीने न्यायलय किंवा राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून विशेष क्रीडा समिती तयार करून वाद मिटवावे ही विनंती. महाराष्ट्र राज्यात गेली ३ वर्ष या वादाला झाली, पण नुसती एकमेकांवर व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून हा दोष-आरोप सुरू आहे म्हणजेचं हा काम करत नाही त्याने संघटनेत आर्थिक गैरव्यवहार केला, पदाचा दुरुपयोग केला हे सगळं थेट तुमच्या खेळाडूंना कळतंय म्हणजेचं हा फटाका नुसता संघटनेला नाही तर खेळाला आहे हे लक्षात घ्यावं. सदर खेळाच्या स्पर्धा होत नाही नुसती निवड चाचणी ती पण एका विशिष्ट जिल्ह्यात (बॉक्सिंग केंद्रात) आणि फक्त तेथेच बॉक्सिंग खेळाडू, प्रशिक्षक, बॉक्सिंग रिंग असावेत असं चित्र आहे. मग नेमकं तुम्ही वाद बॉक्सिंग केंद्रीकरणासाठी घालत आहात की विकेंद्रीकरणासाठी हे समजायला मार्ग नाही. क्रीडा संघटना या खेळाडूंच्या हितासाठी असतात, त्यांच्या सक्षमीकरणासाठी असतात, तुमच्या पदांसाठी किंवा तुमचा मोठेपणा मिरविण्यासाठी नव्हे. प्रशिक्षकांच्या मेहनतीला नजरअंदाज (दुर्लक्ष) करू नका जर प्रशिक्षकांनी उठाव केला तर तुम्ही कोण आहात हे स्वतःलाचं सांगता येणार नाही हे लक्षात ठेवा. एक बॉक्सिंग खेळाडू कार्यकर्ता वाद राज्य संघटनेचा जिल्ह्यात आणू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *