छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे बास्केटबॉल संघाची निवड करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल येथे ३० जुलै रोजी निवड चाचणी घेण्यात येणार आहे .
पुणे येथे ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या १८ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी ७५ व्या कनिष्ठ वयोगटांच्या आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाच्या निवडीसाठी औरंगाबाद जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
ही निवड चाचणी ३० जुलै रोजी (बुधवार) दुपारी ३ वाजता विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे पार पडणार आहे. या निवड चाचणीत ज्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००७ नंतर झालेला आहे असे खेळाडूच या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतील. सहभागी खेळाडूंनी आधार कार्डाची प्रत तसेच जन्म-मृत्यू नोंदणी विभाग (महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) यांच्या मार्फत मिळालेले जन्म प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना सचिव गोविंद मुथुकुमार, सह-सचिव जयंंत देशमुख, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव मंजितसिंग दारोगा (9404477100) आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव गणेश कड (9423397534) यांनी संयुक्तिकरित्या केले आहे.