
राज्य बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने व रोहित ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी – पिनॅकल फाऊंडेशन आणि एसबीए कप पुरस्कृत योनेक्स सनराईज राज्यस्तरीय १५ व १७ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बोरिवलीच्या गाथा सूर्यवंशी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित बोरिवलीच्या गाथा सूर्यवंशी हिने अव्वल मानांकित पुण्याच्या शरयू रांजणेचा २१-१५, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. गाथा ही डीएसपी इंटरनॅशनल शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून हैद्राबाद येथे साई गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत अंतिम लढतीत बोरिवलीच्या गाथा सूर्यवंशी हिने पालघरच्या प्रांजल शिंदेच्या साथीने अव्वल मानांकित कोल्हापूरच्या दक्षयानी पाटील व नागपूरच्या शौर्य मडावी या जोडीचा १८-११ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित पुण्याच्या सचेत त्रिपाठी याने नागपूरच्या अव्वल मानांकित ऋत्व सजवानचा २१-७, १८-२१, २१-१९ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. याच गटात दुहेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या अवधूत कदम व ओजस जोशी यया जोडीने पुण्याच्या सयाजी शेलार व छत्रपती संभाजीनगरच्या उदयन देशमुख यांचा २१-९, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मिश्र दुहेरीत अंतिम लढतीत अव्वल मानांकित नागपूरच्या ऋत्व सजवान व शौर्य मडावी या जोडीने दुसऱ्या मानांकित पुण्याच्या ओजस जोशी व ठाण्याच्या तन्वी घारपुरे यांचा २१-१६, १८-२१, २१-१८ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोहित ग्रुपचे संचालक राजीव मोटवानी, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, वन लिटिल फार्मचे सहसंस्थापक श्रेयस भामरे, पूना गेम फाउंडेशनचे संस्थापक गिरीश नातू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे सहसचिव आणि पीडीएमबीएचे खजिनदार सारंग लागू, तन्मय आगाशे आणि स्पर्धा संयोजन सचिव सुधांशु मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.