
ठाणे जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघातर्फे मागणी
ठाणे ः अकरावी प्रवेश प्रक्रिया चालू असल्या कारणास्तव आंतर शालेय क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी ठाणे जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जिल्हा शाखा ठाणे यांच्यावतीने एक महत्त्वाचे निवेदन सोमवारी ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्याकडे सादर करण्यात आले.
सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच असल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांशी औपचारिकरित्या संलग्न झालेले नाहीत. परिणामी, अंडर १७ व अंडर १९ वयोगटांतील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास अडचण निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर अकरावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाल्यानंतर या वयोगटांतील स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशी ठाम मागणी महासंघाने केली. तसेच, तत्पूर्वी स्पर्धा घेणे आवश्यक असल्यास, त्या फक्त १४ वर्षांखालील वयोगटापुरत्याच मर्यादित ठेवाव्यात, अशीही सूचना करण्यात आली.
सदर निवेदन देताना मुंबई विभाग संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे, उपाध्यक्ष विशाखा आरडेकर, अभ्यास समिती प्रतिनिधी नामदेव पाटील, ठाणे मनपा सचिव एकनाथ पवळे यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के व उपजिल्हाधिकारी रूपाली भलके यांनी निवेदन सहानुभूतीपूर्वक स्वीकारून तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर व मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा न्याय्य सहभाग सुनिश्चित करणे आणि कोणताही विद्यार्थी क्रीडा संधींपासून वंचित राहू नये, हे सुनिश्चित करणे होय असे महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ठाणे जिल्हा संघटनेतर्फे सांगण्यात आले.