
राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
पुणे : सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने व रोहित ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी – पिनॅकल फाऊंडेशन आणि एसबीए कप पुरस्कृत योनेक्स सनराईज राज्यस्तरीय १५ व १७ वर्षाखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात पुण्याच्या शरयू रांजणे, सोयरा शेलार यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात तर, सयाजी शेलार याने मिश्र दुहेरी व १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या एकेरीत नाशिकच्या विश्वजीत थविल याने विजेतेपद पटकावले.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नाशिकच्या विश्वजीत थविल याने दुसऱ्या मानांकित पुण्याच्या चिन्मय फणसेचा २२-२०, १०-२१, २१-१९ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. विश्वजीत हा दिल्ली पब्लिक शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून नाशिक येथे प्रशिक्षक मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित पुण्याच्या शरयू रांजणे हिने आपली शहर सहकारी दुसऱ्या मानांकित सोयरा शेलारचा २१-१९, २१-१० असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. शरयू ही प्रियदर्शिनी शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून अजित कुंभार बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक राजीव बाग आणि अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याचबरोबर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित शरयू रांजणेने सहाव्या मानांकित बोरिवलीच्या अनुष्का इप्टेचा २१-१४, १०-२१, २१-१४ असा संघर्षपूर्ण पराभव करून तिहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
दुहेरीत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या सयाजी शेलार याने संभाजीनगरच्या उदयन देशमुखच्या साथीत दुसऱ्या मानांकित बोरिवलीच्या मयुरेश भुटकी व नाशिकच्या विश्वजीत थविल यांचा २१-१७, २१-१४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या दुहेरीत अंतिम लढतीत शरयू रांजणे व सोयरा शेलार यांनी ख्याती कत्रे व विधी सैनी यांचा २१-१३, २१-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत 15 वर्षांखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्यात पुण्याच्या सयाजी शेलार व सोयरा शेलार या अव्वल मानांकित जोडीने रेयश चौधरी व सिद्धी जगदाळे यांचा २१-११, २१-११ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.