
बुलढाणा ः नांदुरा येथील चॅम्पियन क्रिकेट अकादमीचा दिव्यांग खेळाडू नागेश गोकुळ इंगळे याची भारतीय क्रिकेट संघ निवड चाचणी स्पर्धेकरिता तयार करण्यात आलेल्या इंडिया ब्लू संघात निवड करण्यात आली आहे.
इंडिया ब्लू आणि इंडिया ग्रीन अशा दोन संघात टी 20 स्पर्धा तामिळनाडू येथे खेळवण्यात येत आहे. यापैकी इंडिया ब्लू संघात नागेश याची मध्यमगती गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ३० जुलैपासून तामिळनाडू येथे खेळवण्यात येणार आहे.
नागेशच्या निवडीबद्दल मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी अभिनंदन केले आहे. तसेच नांदुरा भाजप नेते सुधीर मुरहेकर, प्रमोद हिवाळे, शैलेंद्र सिंह राजपूत तसेच तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मी शंकर यादव यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत. नागेशने आपल्या निवडीचे श्रेय आई-वडील तसेच प्रशिक्षक राजेश भोसले, बुलढाणा जिल्हा संयोजक किशोर वाकोडे, रणजीपटू मुन्ना साबिर व जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत साळुंखे यांना दिले आहे.