
धाराशिव ः कोल्हापूर येथील राज्य गुणवंत कामगार व जागृत नागरिक सेवा संस्था मंडळाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२५ चा विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कार धाराशिवचे कुलदीप सावंत व त्यांची पत्नी सारिका सावंत यांना प्रदान करुन गौरविण्यात आले आहे.
या प्रसंगी विरोधी पक्ष गटनेते सत्तेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनंदा, केंद्रीय शिक्षक एज्युकेशन चेअरमन डॉ रविकांत पाटील, सह कामगार आयुक्त विशाल घोडके, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, निमित्त विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, अध्यक्ष सुरेश केसरकर आणि सचिव अच्युतराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कुलदीप सावंत हे गेल्या २० वर्षांपासून क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेजचे सचिव व धाराशिव जिल्हा हँन्डबॉल, स्क्वॉश रॅकेट, डॉजबॉल, श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधनी संघटनेचे सचिव म्हणून ते काम पाहतात. तसेच ते मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडू घडले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल गुणवंत कामगार संघटना धाराशिव, क्रीडा भारती जिल्ह्यातील विविध खेळांच्या एकविध संघटना, धाराशिव आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार व आदी घटक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.