
छत्रपती संभाजीनगर ः गोवा येथे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाद्वारे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स पंच परीक्षेत छत्रपती संभाजीनगर येथील प्रा प्रवीण रावण शिंदे हे उत्तीर्ण झाले आहेत.
२०२१ ते २०२४ या ऑलिम्पिक सायकलमध्ये ही त्यांनी यश संपादन केले होते. प्रत्येक ऑलिम्पिक नंतर जिम्नॅस्टिक्स गुणप्रदान सहिंतेनूसार पंच परीक्षा घेण्यात येत असते. प्रवीण शिंदे हे दुसऱ्यांदा अंतरराष्ट्रीय अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स पंच परीक्षेत उत्तीर्ण होणारे जिल्ह्याचे तसेच मराठवाड्यातील पहिले आणि एकमेव पंच आहेत.
महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स असोसिएशनमध्ये प्रवीण शिंदे हे अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सचे तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पाहतात. प्रवीण शिंदे हे पंच आणि प्रशिक्षक दोन्ही भूमिकेत छत्रपती संभाजीनगरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवत आहेत.
पडेगाव येथे प्रवीण शिंदे हे केआरएस स्पोर्ट्स अकॅडमी चालवतात. या अकॅडमीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवले आहेत. राज्य सचिव डॉ मकरंद जोशी यांच्या तालमीत तयार झालेले आणि प्राचार्य मकरंद जोशी यांना आदर्श मानणारे प्रवीण शिंदे यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे आणि संपूर्ण भारतात अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्समध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.