
नवी दिल्ली ः नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने महिला वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून एक नवा इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे या दिग्गज बुद्धिबळपटूंनी दिव्याचे अभिनंदन केले आहे.
जॉर्जिया येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिव्या देशमुख यांचे अभिनंदन केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की, दिव्या देशमुख यांचे मनापासून अभिनंदन, ज्या १९ वर्षांच्या तरुण वयात फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. कोनेरू हम्पी उपविजेती होती. बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन्ही अंतिम फेरीत भारतीय होत्या. यावरून आपल्या देशात, विशेषतः महिलांमध्ये, प्रतिभेची विपुलता दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवर दिव्या देशमुखच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक फायनलमधील विजयाबद्दल एक पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदींनी लिहिले की ‘दोन महान भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम फेरी’. पंतप्रधानांनी पुढे लिहिले की ‘तरुण दिव्या देशमुख २०२५ ची फिडे महिला विश्वविजेती झाल्याबद्दल अभिमान आहे. या महान विजयाबद्दल तिचे अभिनंदन, जे अनेक तरुणांना प्रेरणा देईल’. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की ‘कोनेरू हम्पीनेही संपूर्ण चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली. मी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो’.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला महिला विश्वचषकातील विजयानंतर अभिनंदन केले. ‘एक्स’ वरील त्यांच्या अभिनंदन संदेशात, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि उपविजेती हम्पी कोनेरू यांचे हार्दिक अभिनंदन!’ त्यांनी त्याच संदेशात पुढे म्हटले आहे की, ‘तुम्ही दोघेही भारताचा अभिमान आहात. तुमच्या क्रीडा प्रतिभेने आणि ऐतिहासिक कामगिरीने जागतिक व्यासपीठावर माँ भारतीचा गौरव केला आहे. तुमच्या दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनंत शुभेच्छा!’
कोट
दिव्या देशमुखने जिंकलेला महिला वर्ल्ड कप भारतीय महिला बुद्धिबळपटूंसाठी फार मोठी घटना आहे. चिनी खेळाडूंच्या वर्चस्वाला धक्का देत भारतीय खेळाडूंनी एक नवा इतिहास रचला आहे. दिव्या आक्रमक शैलीची खेळाडू आहे. दिव्याने तयारी उत्तम केली होती. दिव्याचे विजेतेपद म्हणजे भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे.

- प्रवीण ठिपसे, ग्रँडमास्टर