
वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धा
सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित व आयटीफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ एमटी ४०० वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या सुनील लुल्ला, सोलापूरच्या संध्याराणी बंडगर, सिद्धी खजुरिया यांनी एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

एमएसएलटीए टेनिस सेंटर आणि इलीसीएम क्लब जामश्री कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर पेठ, सोलापूर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत ४० वर्षांवरील महिला गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित सिद्धी खजुरियाने मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या पारुल गुजरातीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. याच गटात दुहेरीत अंतिम लढतीत सिद्धी खजुरिया व संध्याराणी बंडगर यांनी प्रिया जैन व प्रणिता पेडणेकर यांचा ६-१, ६-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

५० वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या सुनील लुल्ला याने कुमुद्दीन खानचा ६-३, ६-१ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मिश्र दुहेरीत अंतिम फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित सुनील लुल्ला याने प्रणिता पेडणेकरच्या साथीत दुसऱ्या मानांकित रिंकू कुमारी व अमित शिंदे यांचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ४० वर्षांवरील पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित रमजान शेखने अव्वल मानांकित संदीप पवारवर ६-४, ६-२ असा सनसनाटी विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित बद्री विशाल याने चौथ्या मानांकित गौतम गाडगीळचा ६-४, ०-४, १०-८ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.