
मुंबई ः आयपीएल २०२४ चे विजेते कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने मंगळवारी ही माहिती दिली.
चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाखाली केकेआरने आयपीएलच्या १७ व्या हंगामाचे (२०२४) विजेतेपद जिंकले. जेतेपदाच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा आठ विकेट्सने पराभव केला.
केकेआरने सोशल मीडियावर लिहिले की, ‘चंद्रकांत पंडित यांनी नवीन संधी शोधण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ते कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार नाहीत. २०२४ च्या टाटा आयपीएल चॅम्पियनशिपमध्ये केकेआरचे नेतृत्व करणे आणि एक मजबूत संघ तयार करणे यासह त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्या नेतृत्वाचा आणि शिस्तीचा संघावर खोलवर परिणाम झाला आहे. भविष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.’ २०२२ मध्ये केकेआरचे मुख्य प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पंडित यांची नियुक्ती करण्यात आली.
२०२५ च्या आयपीएलमध्ये केकेआरचा प्रवास कसा होता?
आयपीएलच्या १८ व्या हंगामात केकेआरचा प्रवास फारसा खास नव्हता. हंगाम सुरू होण्यापूर्वी संघाने श्रेयस अय्यरला सोडले आणि अजिंक्य रहाणेला संघाची कमान सोपवली. या आवृत्तीत, फ्रँचायझीने एकूण १४ सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी फक्त पाच सामने जिंकले तर केकेआर संघाने सात सामने गमावले. आयपीएल २०२५ मध्ये केकेआर आठव्या स्थानावर राहिला.