
सचिवपदी रवींद्र बिनीवाले तर खजिनदारपदी मारुती गायकवाड
सांगली ः सांगली जिल्हा क्रिकेट संघटना निर्देशीत समितीच्या अध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी उपाध्यक्ष म्हणून सुधीर सिहासने यांची निवड झाली आहे.
या बैठकीला समितीचे सचिव रवींद्र बिनिवाले, नूतन सदस्य पृथ्वीराज पवार, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक तथा सदस्य अनिल जोब, जयंत टिकेकर, संजीव शाळगावकर हे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
सम्राट महाडिक म्हणाले की, तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून मी जिल्हा क्रिकेट संघटनेत आलो आहे. क्रिकेटच्या विकासासाठी काम करणार आहे. या प्रवासात वाद नको आहे. संजय बजाज यांच्याशी चर्चेची आमची तयारी आहे. आम्हाला क्रिकेट पुढे न्यायचे आहे. त्यांनीही त्यासाठी पुढे यावे. समज-गैरसमज असतील तर ते दूर करू. सिकंदर अमिन यांनी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहन केले.
यावेळी रवींद्र बिनीवाले म्हणाले की, निर्देशित समितीत झालेल्या बदलाबाबतची कागदपत्रे आमच्याकडे असलेले बहुमत व त्याद्वारे झालेले निर्णय हे सारे आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि ज़िल्हा क्रिकेट संघटनेचे खाते असलेल्या बँकेला कळवणार आहोत. बँकेने आम्हाला नोटीस देवून कागदपत्रे मागवली आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्यात अडचण राहणार नाही.
सम्राट महाडिक म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजपच्या सत्तेचा उपयोग करून जिल्ह्यातील क्रिकेटचे चित्र बदले जाईल. क्रीडांगण विकास, खेळाडूंसाठी योजना, स्पर्धा सर्व पातळीवर बदल होतील खेळात राजकारण आणणार नाही. जिल्हातील बहुतांश सर्व क्रिकेट अकॅडमी, प्रशिक्षक आणि अंपायर यांनी या संघटनेला पाठिंबा दिला आहे.