
धुळे ः नेटबॉल फेडरेशन इंडियाच्या वतीने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान चंदीगड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय (वेस्ट झोन) राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनची सर्वोत्कृष्ट गोल शुटर महिला खेळाडू साक्षी संजय पाटील हिची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.
सदर निवड अमरावती येथे महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या अॅडहाॅक कमिटीचे अध्यक्ष डॉ एस एन मुर्ती, संयोजक ऋतुराज यादव, सदस्य पवनकुमार पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवड चाचणीतून नेटबॉल फेडरेशन इंडियाचे निरीक्षक एस मोहन राव (छत्तीसगड) यांनी केली आहे.
साक्षी पाटीलने याअगोदर देखील आंतरशालेय व संघटनेच्या वतीने सबज्युनिअर, ज्युनिअर सिनिअर (महिला) गटातून एकोणीस वेळा राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत तीन सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्यपदके पटकावली आहेत. चार राष्ट्रीय स्पर्धेतही साक्षीने सहभाग नोंदवून महाराष्ट्र संघाचे दोन वेळा नेतृत्व केले आहे. धुळे जिल्हा सचिव योगेश वाघ यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. नेटबॉल फेडरेशन इंडियाचे हरिओम कौशिक, विनायक शिंदे, कुणाल पवार, आकाश शिंदे, अविनाश वाघ, महेंद्र गावडे, निलेश चौधरी, अक्षय हिरे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.