< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); दर्जेदार व अनुभवाधिष्ठीत शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘खान अकॅडमी इंडिया’ व ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’सोबत सामंजस्य करार – Sport Splus

दर्जेदार व अनुभवाधिष्ठीत शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘खान अकॅडमी इंडिया’ व ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’सोबत सामंजस्य करार

  • By admin
  • July 31, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी इंडिया’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार केले. या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळणार आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करून त्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने हे करार महत्त्वपूर्ण आहेत. श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने राज्यातील १५० शाळांमध्ये आधुनिक व अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तर खान अकॅडमीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या नावाने मराठी व इंग्रजी भाषांमध्ये दर्जेदार अध्ययन कार्यक्रम तयार केला जाणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यास मदत होईल व इतर शाळांनाही प्रेरणा मिळेल. श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेने यापूर्वीही पाणी व्यवस्थापन व शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र शासनासोबत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग एक नवा आदर्श ठरेल.

‘डॉ जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’

‘खान अकॅडमी इंडिया’ यांच्याशी झालेल्या कराराअंतर्गत ‘डॉ जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविला जाणार आहे. ज्याचा उद्देश इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयातील आकलन वाढवणे आहे. मराठी व इंग्रजी भाषांमध्ये हे अध्ययन कार्यक्रम उपलब्ध असणार आहे. ही अकॅडमी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था असून, विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी देते. त्यांनी १० हजारांहून अधिक शैक्षणिक व्हिडिओ विकसित केले आहेत. हा करार ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला असून, या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एससीईआरटी) करणार आहे.

१५० शाळांमध्ये अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित होणार

शालेय शिक्षण विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत कार्यरत श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य करारानुसार, प्रारंभी १५० शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या शाळांची पूर्वतपासणी करण्यात येईल आणि शाळा विकास आराखडा तयार केला जाईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उल्लेख केलेल्या ‘स्कूल कॉम्प्लेक्स’ या संकल्पनेनुसार मॉडेल शाळा, पीएम श्री आणि सीएम श्री शाळांचा या उपक्रमात समावेश करण्यात येईल. शिक्षण, ग्रामीण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, शिक्षक व विद्यार्थ्यांचा क्षमता विकास तसेच समाजाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे या घटकांवर विशेष भर देणार आहे.

यावेळी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, खान अकॅडमी इंडियाच्या स्वाती वासुदेवन व शोभना मित्तल, श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रसन्ना प्रभू व मनीष बादियानी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *