
- भरत कोळी, शारीरिक शिक्षण तथा क्रीडा समन्वयक, शिरपूर.

आजकाल आपण अगदी बिनधास्तपणे सोशल मीडिया असो किंवा आरामदायी जीवनशैली असो या दोन्हीचा आपण मनसोक्त उपभोग घेतो. पण प्रामुख्याने आपण स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो आणि ही बाब भविष्यात आपल्या शरीरासाठी फार घातक ठरणारी आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कारण तुम्ही २१ व्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शतकात वावरत आहात जिथं तुमचा संपर्क हा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक तंत्रज्ञानाशी होईल. उदा. मोबाईल, संगणक, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोटारगाडी, लिफ्ट, कामाच्या ठिकाणी विविध कार्य करणारी यंत्रे ही सर्वसमावेशक अशा मूलभूत गोष्टीं आपल्या जीवनात समाविष्ट झाल्या आहेत आणि विशेष म्हणजे या गोष्टींचा काही फायदा आणि तोटा मानवाला होतो. फायदा जर बघितला तर वेळेची फार मोठी बचत इथं होते. लागणारा प्राथमिक खर्च कमी होतो, मानवाचं शारीरिक श्रम कमी लागते. आणि तोटा जर बघितला तर मानवाच्या शारीरिक क्रिया कमी झाल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात सध्या स्थितीत निर्माण होत असताना आपण बघत आहोत. खरंतर तंत्रज्ञान हे भविष्याची फार मोठी गरज आहे. तंत्रज्ञानाशिवाय मानवाची प्रगती होणं अपेक्षित नाही. पण याचा वापर कधी, कुठं, कसा आणि किती याचे प्रमाण नक्कीचं मानवाने ठरवायला हवं. कारण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तंत्रज्ञान हे तुम्हाला आरोग्य (वैद्यकीय) क्षेत्रात बहुमोल ठरेल. शिवाय शैक्षणिक क्षेत्रात, बँकिंग,औद्योगिक, माहिती सेवा, सामाजिक व शेती अशा अनेक ठिकाणी तंत्रज्ञान प्रभावी ठरणारे आहे. पण मानवाने तंत्रज्ञानाची मर्यादा ठरवायला हवी. विशेष म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनाने त्यातल्या-त्यात सध्या मानसिक आरोग्य हे देशाची डोकेदुखी ठरलेली आहे. आत्महत्या हे मानसिक आरोग्याचे मोठं लक्षण म्हणतात येईल. त्यामुळं समाज व व्यक्ती म्हणून आपण सर्वांनी स्वतःचे आणि समाजाचे मानसिक आरोग्य कसं उत्तम ठेवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
१) मानसिक आरोग्याची संकल्पना समजून घ्या
खरंतर तुम्हाला कुठलाही रोग किंवा आजार नाही म्हणून तुमचं आरोग्य उत्तमच आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण उत्तम आरोग्य असणं म्हणजे तुम्ही शारीरिक व मानसिक सुदृढ असणं फार अपेक्षित असतं. दैनंदिन व्यवहारात तुम्ही स्वतःची कार्यप्रणाली आणि जीवनशैली कशी ठेवता यावर तुमचं उत्तम आरोग्य ठरतं. त्याशिवाय आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आरोग्य हे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण असे घटक आहे. जे तुम्हाला आनंदी व सक्रिय ठेवण्यास, ताण-तणावांचा सामना करण्यास, समाज व लोकांशी चांगला संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम असं कार्य करते. म्हणून मानसिक आरोग्याचे संकल्पना समजून घ्या.
२) शारीरिक सक्रिय व सुदृढ रहा
दैनंदिन व्यवहारात आपल्या शारीरिक गरजेनुसार आपण शारीरिक सक्रिय असणं अपेक्षित असतं, शरीराची हालचाल ही नियमित झाली पाहिजे, उदा. चालणं, दिवसभरातील कार्य इत्यादी. त्याचबरोवर नियमित व्यायाम, योगा, खेळ, सायकलिंग, ट्रेकिंग अशा माध्यमातून स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणं हे शारीरिक व मानसिक आरोग्याचे दृष्टीने फार महत्वाचे आहे. तुम्ही जितकं शरीराला उत्तम ठेवाल तितकचं तुमचं आयुष्य दीर्घायुष्य होईल. नियमित तुम्ही शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी होत राहणार त्याप्रमाणेच तुम्ही जास्तीत-जास्त आनंदी जीवनशैलीचा लाभ घेत राहणार. म्हणून स्वतःला शारीरिक सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करत रहा अर्थात शारीरिक सक्रिय रहा आणि स्वतःला सुदृढ ठेवा.
३) योग्य ती झोप घ्या
आजच्या पिढीला सोशल मीडियाचे लागलेलं वेळ अर्थात वाढेललं ‘स्क्रीन टाइम’. त्यामुळे झोपेची मोडतोड झालेली दिसते. साधारणपणे मानवाला ८ तास झोपेची आवश्यकता उत्तम आरोग्याच्या दृष्टीने गरजेची असते. पण वाढत्या मोबाईलच्या वापरामुळं वेळेवर झोप होत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी झोप लागणे, आळस येणे, काम न होणे असे प्रकार समोर येतात आणि यातून मानवाला नैराश्य, भीती, चिंता, मानसिक थकवा अशा समस्या उद्भवतात अशामुळे ‘मानसिक आरोग्याच्या समस्या आपणांस जळतात’ म्हणून वेळेवर योग्य ती झोप घ्या, सकाळी लवकर उठा आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवा.
४) छंद जोपासा
मानसिक आरोग्यासाठी छंद जोपासणे हे मानसिक आरोग्याचे एक प्रेरक असं तत्व आहे आणि असं म्हणायला हरकत नाही. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये जर माणूस व्यस्त राहिला तर तो उत्साही, ऊर्जाशील आणि आनंदी असतो, आवडीच्या गोष्टींना वेळ देणं हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनाने फार महत्वाचं आहे. खास करून छंद मग त्यात लिहिणं, वाचणं, खेळणं, फिरणं अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. स्वतःचा छंद जोपासला की ताण-तणाव निर्माण होत नाही अर्थात नैराश्य येत नाही, आत्मविश्वास वाढतो, नवीन गोष्टी शिकण्यास चालना मिळते, सर्जनशीलता वाढते, त्यासह महत्वाच्या गोष्टी करताना आपण समाधानकारक व आनंदाने कार्य करतो. म्हणून तुमचा आवडता छंद हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीचं जोपासा जर तुम्हाला स्वतःचं उत्तम असं मानसिक आरोग्य ठेवायचं असेल तर.
५) आनंदी व सकारात्मक रहा
यश-अपयश या दोन्ही गोष्टी काहींना-काही नेहमीचं शिकवित असतात. म्हणून दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या जीवनात सतत होत असतात. म्हणून यश आलं की पचवता आलं पाहिजे आणि अपयश आलं की त्यातून शिकता आले पाहिजे. म्हणजेज तुम्ही तुमच्या जीवनात नियमितपणे अध्ययनकर्त्याची भूमिका जर असेल तर भविष्यात तुम्ही मोठ्या शिखरावर असाल हे तत्त्व लक्षात ठेवत, जीवनात आनंदी व सकारात्मक असणं हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तुमच्या प्रत्येक कार्यात जर तुम्ही आनंदी असाल तर येणारा प्रत्येक परिणाम तुम्हाला ताण-तणावात आणत नाही. यामुळे तुमचं मानसिक सक्रियता ही उत्तम राहते, त्याचबरोबर जेव्हा अडथळे येतात तेंव्हा निर्णय हे शांतपणे आणि विचारपूर्वक तुमच्याकडून लागतात, त्यासह चिडचिडपणा होत नाही, अपेक्षित असं वर्तन तुमच्याकडून होत जातं म्हणून आयुष्यात आनंदी व सकारात्मक रहा आणि त्याचा सराव करा.
६) निरोगी रहा
मानसिक आरोग्याची समस्या या मोठ्या प्रमाणात व्यसनातून निर्माण होतात. त्यात मोबाईलचे व्यसन, अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, जुगार अशा गोष्टींमुळे शारीरिक आरोग्यासह, मानसिक आरोग्याची मोठी हानी होताना दिसते. या व्यसनांमुळे योग्य ती झोप होत नसल्याने शारीरिक व्यायाम होत नाही. त्यामुळं शरीरात शारीरिक व्याधी निर्माण होतात. त्याचबरोबर एखादे कार्य करताना एकाग्रता लागत नाही. त्यातून नैराश्य, चिंता होते आणि हे सर्व बाबीं मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून जेवढं निरोगी राहता येईल तेवढं निरोगी राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
खरंतर मानसिक आरोग्याचे अनेक लक्षणे आहेत. पण प्रामुख्याने आपण स्वतःला निरोगी, आनंदी, सकारात्मक ठेवलं तर मानसिक आरोग्याच्या समस्या आपल्या जीवनात उद्भवत नाही. त्यामुळं तुम्ही विद्यार्थी किंवा शिक्षक/प्राध्यापक असाल तर नियमितपणे वरिल गोष्टींचा (मुद्दे) आढावा घेऊन मानसिक आरोग्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे.