
भूषण चंद्र, वेंकटचलम स्वामीनाथन, श्रीकांत पारेख यांना विजेतेपद
सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित व आयटीफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ एमटी ४०० वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाज, तुलसी सिद्धाराजू यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, भूषण चंद्र, वेंकटचलम स्वामीनाथन, श्रीकांत पारेख यांनी विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए टेनिस सेंटर आणि इलीसीएम क्लब जामश्री कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर पेठ, सोलापूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत ६० वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित भूषण चंद्र याने सहाव्या मानांकित दीपंकर चक्रवर्तीचा ६-२, ६-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ६५ वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित अजित भारद्वाजने प्रमोद दीक्षितचा टायब्रेकमध्ये ७-६ (३), ७-६ (३) असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. याच गटात दुहेरीत अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अजित भारद्वाज व राकेश कोहली या जोडीने दुसऱ्या मानांकित ओपी दिक्षित व प्रमोद दीक्षित यांचा ६-३, १-६, १०-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
७० वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित तुलसी सिद्धाराजू याने अव्वल मानांकित जॉर्ज थॉमस पुथुपारंबिलचा ६-४, ४-६, १०-१ असा सुपर टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत याच गटात अंतिम फेरीत ताहिर अली व तुलसी सिद्धाराजू यांनी जॉर्ज थॉमस पुथुपरंबिल व एसजेएस रंधावा या अव्वल मानांकित जोडीचा ६-३, ६-३ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. ७५ वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित वेंकटचलम स्वामीनाथन याने अव्वल मानांकित गोविंद कुमारचा ६-२, ५-७, १०-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत अव्वल मानांकित गोविंद कुमार व धवल पटेल या जोडीने श्रीकांत पारेख व अनंता तातावर्ती यांचा ७-६ (४), ७-५ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
८० वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत श्रीकांत पारेख याने जनार्दन कांबळेचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व गुण देण्यात आले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी सनदी अधिकारी मीणा प्रभुदयाल, सचिव संरक्षण भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रामा राव डोसा, स्पर्धा संयोजन सचिव राजीव देसाई आणि आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.