
मुंबई ः भुवनेश्वर येथे झालेल्या तिसऱया ५० बॉल्स क्रिकेट युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई विभाग संघाने शानदार कामगिरी बजावली. या स्पर्धेत बिहार संघाने विजेतेपद पटकावले.
भुवनेश्वर येथील सी. व्ही. रमण ग्लोबल विद्यापीठ परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. भारतभरातील निवडक युवा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि ५० बॉल्स क्रिकेटच्या वेगळ्या व जलद स्वरूपात आपली चमकदार कामगिरी सादर केली. या स्पर्धेचं आयोजन ओडिशा ५० बॉल क्रिकेट असोसिएशनद्वारे करण्यात आले होते आणि ज्याचे आयोजन सचिव आलोक चौधरी हे होते. ते ओडिशा राज्य संघटनेचे महासचिव देखील आहेत.
ही स्पर्धा अॅमेच्युअर ५० बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली पार पडली. यावेळी संस्थापक आणि राष्ट्रीय महासचिव ईशान जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आयोजक मंडळाचे वाखाणण्याजोगे नियोजन आणि संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन केले.
बिहार ५० बॉल क्रिकेट असोसिएशनने ही स्पर्धा जिंकून अजिंक्यपद पटकावले. त्यांनी शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले. स्पर्धेचे उपविजेतेपद यजमान संघ ओडिशा ५० बॉल क्रिकेट असोसिएशनने पटकावले. त्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई विभाग ५० बॉल क्रिकेट असोसिएशनच्या संघाने ही जबरदस्त कामगिरी केली. १५ कुशल युवा खेळाडूंचा असलेला हा संघ संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेत ध्रुव गरुड (कर्णधार), दुर्गेश कोळी, ऋतुराज सरोज, अभिजीत चंद, पार्थ बोडके, अथर्व, अरिबक, रिएक्शन, आयुष, राम या खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली.
मुंबई संघाच्या यशात मुंबई ५० बॉल क्रिकेट असोसिएशन मधील नेतृत्वाची मोलाची भूमिका होती. अध्यक्ष चंद्रशेखर पाथरे, महिला विभाग प्रमुख श्रीमती पाथरे, संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी शरद वाबले, विभाग प्रमुख आणि महासचिव रामशरण शर्मा, खजिनदार ओमप्रकाश यादव आणि निवड समिती हेड कोच कृष्णा देवेंद्र यांनी या संघाच्या शानदार कामगिरीचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्य ५० बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष योगेश चौधरी आणि महासचिव विजय टेपुगडे यांनीही मुंबई संघाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या शिस्तप्रिय व उत्कृष्ट खेळाची प्रशंसा केली.
स्पर्धेदरम्यान महाराष्ट्रातून आलेल्या फिजिओथेरपी टीमने खेळाडूंच्या आरोग्य व फिटनेससाठी महत्वाचे कार्य केले. विशेषतः डॉ तेजश्री पाथाडे आणि डॉ लव अमृतकर यांनी वैद्यकीय सेवा देत खेळाडूंना सर्वोत्तम स्थितीत राहण्यासाठी सहाय्य केले.
मुंबई संघासाठी निवड प्रक्रिया
मुंबई संघ निवड करण्याचा पहिला टप्पा चेंबूर एज्युकेशन सोसायटी येथे पार पडला. निवड प्रक्रियेचे नेतृत्व शरद वाबले, रामशरण शर्मा आणि ओमप्रकाश यादव यांनी केले. जितेंद्र लिंबकर यांनी निरीक्षक म्हणून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवली. दुसरा टप्पा २१ मे २०२५ रोजी सेव्हन स्टार क्रिकेट अकॅडमी, अलीबाग-पेन येथे प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तिसरा टप्पा ठाणे येथे वैभव सर यांच्या देखरेखीखाली संपन्न झाला.
तिसरी ५० बॉल्स क्रिकेट युवा राष्ट्रीय स्पर्धा २०२५ ही नव्या खेळाडूंसाठी एक उत्कृष्ट मंच ठरली. संघटन, निवड प्रक्रिया, खेळाडूंची मेहनत आणि नेतृत्व यामुळे हा जलदगती क्रिकेट फॉरमॅट देशभर लोकप्रिय होत असून, याचे भविष्य उज्ज्वल आहे असे महासचिव रामशरण शर्मा यांनी सांगितले.