
मुंबई ः रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रायगडच्या सुयश पवार याने – ७४ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत लाईट कॉन्टॅक्ट या इव्हेंट मध्ये सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे आता त्याची दुबई येथे आगामी नोंव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप किकबाक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रायगड – पनवेल येथील सुयश पवार याला बालपणापासून मार्शल आर्ट खेळायची आवड होती. त्याने मार्शल आर्ट क्षेत्रामध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन अनेक पदक पटकावली आहेत. हिंजवडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. त्याला पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक निलेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष परेश शेठ ठाकूर, सचिव मंदार पनवेलकर, वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार आणि सचिव धीरज वाघमारे यांनी त्याचे खास अभिनंदन केले.