
अनघा करंदीकरच्या दुहेरी मुकुटासह एकूण ७ पदकांची कमाई
ठाणे ः सातारा येथे नुकत्याच झालेल्या योनेक्स सनराईस श्री. छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती पहिल्या महाराष्ट्र सीनियर राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत राज्य पातळीवर ठाण्याचे वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. २ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई करत ठाण्याने सर्व वयोगटांमध्ये आपली ताकद दाखवून दिली.
या स्पर्धेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अनघा करंदीकरच्या दुहेरी विजयाने. तिने महिला दुहेरीत सिया सिंगसोबत आणि मिश्र दुहेरीत अमन फारोघ संजयसोबत एकापाठोपाठ एक निर्णायक सामने जिंकत ‘दुहेरी मुकुट’ पटकाविला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अनघा-सिया जोडीने पुण्याच्या श्रुती मुंदडा आणि तनिष्का देशपांडे या गुणी जोडीला १७-२१, २१-१७, २१-१२ अशा तीन सेट्समध्ये हरवत सुवर्ण पटकावले. उपांत्य फेरीत त्यांनी ठाण्याच्याच अमन नौशाद आणि सोनाली मिरखेलकर या जोडीवर १६-२१, २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला.
मिश्र दुहेरी गटातही अनघा- अमन जोडीने जबरदस्त खेळ सादर करत सुवर्ण पटकावले. या गटात अमन नौशाद – सोनाली मिरखेलकर यांनी रौप्य पदक मिळवले तर सोहम फाटक – इशिता कोरगावकर जोडीने कांस्यपदकावर नाव कोरले.
पुरुष एकेरीत अथर्व जोशीने झुंजार खेळ करत अंतिम फेरी गाठली. त्याने वरुण कपूरविरुद्ध अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात १६-२१, २१-१५, १७-२१ अशी झुंज देत रौप्य पदक जिंकले. त्याचा डावखुरा खेळ, नेटवरील अचूकता आणि मानसिक समतोल विशेष कौतुकास्पद ठरले. पुरुष दुहेरीत कबीर कंझारकर याने आपल्या जोडीदारासह सामन्यांमध्ये तगडे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्यांनी २१-२३, २१-१८, ६-२१ अशा सेट्समध्ये झुंज दिली आणि रौप्य पदक मिळवले. याच गटात अर्जुन आणि आर्यन बिराजदार या भावंडांनी दमदार खेळ करत कांस्य पदक मिळवले.
या सातही पदकांमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या मेहनत, शिस्त आणि कौशल्याचा उत्तम परिचय दिला आहे. यासंदर्भात मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी सांगितले, “खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव आणि सामन्यांमधील शांत डोक्याने घेतलेले निर्णय यामुळेच हे यश शक्य झाले आहे. हे राज्यपातळीवरील यश आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तराकडे करणाऱ्या वाटचालीची पायाभरणी ठरेल.”
या यशावर ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत सांगितले, “तुमचा हा विजय ठाणे शहरासाठी अभिमानास्पद आहे. हीच जिद्द आणि मेहनत कायम ठेवा. आगामी स्पर्धांसाठी खूप शुभेच्छा.”