< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); निसर्गाच्या कुशीत भरली शाळा ! – Sport Splus

निसर्गाच्या कुशीत भरली शाळा !

  • By admin
  • August 2, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ जयंतीनिमित्त श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची प्रेरणादायी गिरिभ्रमण मोहीम

जालना ः रविवारचा दिवस सुट्टी असते. विद्यार्थ्यांनी घरी झोपून आराम करावा, मोबाईलवर वेळ घालवावा अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं! झोपी गेलेल्या डोंगरांना विद्यार्थ्यांच्या पावलांनी जाग आली पक्ष्यांच्या किलबिलाटात शिकवणी सुरू झाली आणि निसर्गाच्या कुशीत एका वेगळ्याच शाळेचा प्रारंभ झाला.

श्रावण महिन्याच्या हिरवाईने नटलेल्या गवताळ पठारांवर, गूढ निसर्गरम्य झऱ्यांच्या आवाजात, सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखी गिरीभ्रमण मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम म्हणजे निव्वळ सहल नव्हती ती होती विद्यार्थ्यांच्या मनात निसर्ग, धाडस, शिस्त, पर्यावरण प्रेम आणि देशाभिमानाचे बीज पेरणारी ‘यात्रा’. मोहिमेचा हेतू निसर्ग हिच गुरू शाळा. 

या उपक्रमाचा केंद्रबिंदू एकच होता, निसर्गाशी नातं जोडणं. आजच्या डिजिटल युगात मुलांचा निसर्गाशी संबंध तुटत चाललाय. हे लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना पावसाळी निसर्गाच्या सान्निध्यात नेऊन, निसर्गापासून शिकण्याचा सुंदर प्रयोग करण्यात आला. ‘मजेसाठी पर्यटन’ न करता, ‘शिकण्यासाठी पर्यटन’ हाच संदेश यामागे होता.

या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी गिर्यारोहक, क्रीडा शिक्षक किशोर नावकर यांनी केले. त्यांनी देश-विदेशातील अति उंच पर्वतरांगांवर यशस्वी चढाई करताना सरस्वती भुवन संस्थेचा ध्वज आणि भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला आहे. त्यांच्या प्रेरक अनुभवातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये धाडस, चिकाटी आणि देशप्रेम रुजले.

गिरीभ्रमण म्हणजे फक्त चालणे नव्हे, ती असते शिस्त, योजना, सहकार्य, संयम आणि आत्मविश्वासाची शाळा. किशोर नावकर विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण कौशल्य, निसर्गस्नेही वर्तन आणि संघभावना शिकवली. त्यांना जालना शाखेतील कुलकर्णी आर पी, खरबे बी एन, भालमोडे बी एस काकडे एन जे देशपांडे एच व्ही,  बेंद्रे डी व्ही, ए डी हेलगे, डी जे संन्याशी, ए बी बनसोडे, पवार एस पी, कुंभार पिंपळगाव शाखेचे रामचंद्र इलतेपोड, शेषराव बोंबले आणि रांजणी शाखेचे जहागीरदार एस आर, अंभोरे डी एच, बळवंत एस एफ, भुतेकर एस पी, देशमुख एल व्ही, वायकोस अंजली, वरखडे मीना, संदीप पाटोळे या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

निसर्गमय कक्षा – शंभू महादेव /नांगरतास
या मोहिमेची पार्श्वभूमी ठरली शंभू महादेव नांगरतास – ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि निसर्गरम्य परिसर. गवताळ रानं, वाहते पाणी, थंडगार वारा आणि पक्ष्यांच्या सुरेल सादांनी या जागेला एक वेगळी अनुभूती दिली. येथेच ‘निसर्ग शाळा’ भरली… आणि रविवारचा दिवस एक संस्मरणीय आठवण बनून गेला.

तीन शाखांचा एकत्रित अनुभव
या उपक्रमात श्री सरस्वती भुवन प्रशाला, जालना, श्री सरस्वती भुवन प्रशाला, रांजणी आणि श्री सरस्वती भुवन प्रशाला, कुंभार पिंपळगाव अशा तीन शाखांमधील एकूण २५५ विद्यार्थी, २२ शिक्षक सहभागी झाले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *