
नीरव मुळ्ये, वरदान कोलते व शरण्या पटवर्धन यांना उपविजेतेपद
पुणे ः सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांनी आयोजित केलेल्या रियाना बुटा चषक दुसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या कौस्तुभ गिरगावकर यांनी मुलांच्या सतरा वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकाविले. त्याचे अन्य सहकारी नीरव मुळ्ये, वरदान कोलते व शरण्या पटवर्धन यांनी आपापल्या गटात उपविजेतेपद पटकाविले.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेली ही स्पर्धा कुपवाड येथील सूरज फाउंडेशन, नवकृष्णा व्हॅली बॅडमिंटन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या सतरा वर्षांखालील गटात कौस्तुभ या चौथ्या मानांकित खेळाडूने अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित खेळाडू आकांक्ष साहू टीएसटी याच्यावर १२-१०, ११-७, ११-८ असा सफाईदार विजय मिळविला. त्याने सुरुवातीपासूनच अष्टपैलू खेळ करीत सामन्यावर वर्चस्व गाजविले. उपांत्य फेरीत कौस्तुभ याने आठवा मानांकित प्रतिक तुलसानी या ठाण्याच्या खेळाडूला ११-९, ११-८, ११-८ असे पराभूत केले होते. साहू याने पुण्याच्या ईशान खांडेकर याचे आव्हान १३-११, ११-६, १२-१० असे संपुष्टात आणले होते.

मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित अयान आठर (टीएसटी) याने पुण्याच्या द्वितीय मानांकित नीरव मुळ्ये याच्यावर ११-८, ११-७, ११-५ असा सहज विजय नोंदविला. अकरा वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत चौथ्या मानांकित युवान वालिया (मुंबई महानगर जिल्हा) याने पुण्याच्या वरदान कोलते या द्वितीय मानांकित खेळाडूला ६-११, १५-१३, ११-९, ११-५ असे अटीतटीच्या लढतीनंतर पराभूत केले. मुलींच्या अकरा वर्षाखालील गटात पुण्याच्या शरण्या पटवर्धन या दहाव्या मानांकित खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात अग्रमानांकित खेळाडू आद्या बाहेती परभणी हिने तिच्यावर ११-७, ११-१, ११-२ असा एकतर्फी विजय मिळविला.

स्पर्धेतील अन्य अंतिम निकाल पुढीलप्रमाणे पंधरा वर्षाखालील मुली – सान्वी पुराणिक (ठाणे) विजयी विरुद्ध मायरा सांगेलकर (टीएसटी) ५-११, ११-३, ८-११, ११-९, ११-६. मुले परम भिवंडीकर (टीएसटी) विजयी विरुद्ध प्रतिक तुलसानी (ठाणे) ११-६, ११-९, ९-११, ११-६.
मुली तेरा वर्षाखालील – केशिका पूरकर (नाशिक) विजयी विरुद्ध ऋतनया देवळेकर
(टीएसटी) ११-७, १२-१०, ११-९.