
खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करावी – जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड
पालघर : पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पालघर जिल्हा क्रीडा शिक्षक सभा’ नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेला जिल्हाभरातील तब्बल ४५० क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय क्रीडा स्पर्धांचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. जिल्ह्यातील आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा या स्पर्धांमध्ये सहभाग वाढावा यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष इंदू राणी जाखड यांनी मार्गदर्शन केले. “जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा, त्यासाठी शालेय स्तरावर अधिकाधिक सहभाग महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा योजना, उपक्रम, अर्ज नमुने आणि मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोर्टलचा लाभ वसई-विरारपासून ते तलासरी-मोखाड्यापर्यंत दुर्गम भागातील खेळाडूंनाही होणार आहे.
यावेळी पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी गिरीश एरणाक, अमृत घाडगे, मयूर कॉलम, जयवंती देशमुख, प्रितेश पाटील, चेतन मोरे, सरिता वळवी, प्रणवते गावंडे आदींसह सर्व तालुका क्रीडा केंद्रप्रमुख, जिल्हा क्रीडा समन्वयक व निवृत्त क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
शालेय क्रीडा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी एकजूट होण्याचा निर्धार या सभेमधून दिसून आला. संकेतस्थळाच्या माध्यमातून पालघर जिल्हा आता क्रीडा क्षेत्रात नव्या उंची गाठण्यास सज्ज झाला आहे.