
भारतीय संघाला १६ पदकांसह सांघिक विजेतेपद
कुचिंग, मलेशिया ः भारतीय तायक्वांदो संघाचे प्रशिक्षक तुषार तानाजी सिनलकर यांना दहाव्या आशियाई पॅरा तायक्वांदो पुमसे अजिंक्यपद स्पर्धा २०२५ (जी ४) मधील त्यांच्या उत्तम कामगिरी करीता ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक (पुरुष)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२५ रोजी कुचिंग, सारावाक (मलेशिया) येथे उत्साहात पार पडली.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता असलेली व जागतिक तसेच आशियाई तायक्वांदो संघटनेशी संलग्न असलेल्या ‘इंडिया तायक्वांदो’ या अधिकृत राष्ट्रीय संघटनेतर्फे हा संघ आशियाई स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने ६ सुवर्ण पदकांसह एकूण १६ पदकांची कमाई केली. पुरुष संघाने सांघिक विजेतेपद पटकावले तर महिला संघ उपविजयी राहिला. जुनियर, कॅडेट व पॅरा या गटातील क्योरूगी तसेच पुमसे प्रकारातील या स्पर्धेसाठी आशिया खंडातील १००० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
तुषार सिनलकर हे ४ डॅन ब्लॅक बेल्ट असून आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक देखील आहेत. तसेच त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये बहारीन येथे झालेल्या जागतिक पॅरा तायक्वांदो पुमसे अजिंक्यपद स्पर्धेत देखील भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पडली होती. याशिवाय १४ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑस्ट्रेलिया मधील गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या २०२५ अध्यक्ष चषक – ओशनिया (जी ३) व ऑस्ट्रेलियन खुल्या (जी २) स्पर्धेसाठी ‘आंतरराष्ट्रीय पंच’ म्हणून नियुक्त झाले आहेत.
तुषार सिनलकर यांच्या यशाबद्दल इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगांवकर, संघ प्रमुख वीणा अरोरा, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफ्फार पठाण, खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी तसेच आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.