
नागपूरच्या कन्येची ही ऐतिहासिक कामगिरी सर्वांसाठी अभिमानाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे फिडे महिला विश्वचषकाची विजेती आणि महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखचा भव्य ‘नागरी सन्मान सोहळा’ संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे ३ कोटीचा तर महाराष्ट्र चेस असोसिएशनमार्फत ११ लाखांचा धनादेश देऊन दिव्या देशमुखचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गौरवोद्गार काढताना सांगितले की, केवळ १९व्या वर्षी हा जागतिक किताब पटकावत दिव्याने संपूर्ण देशाचा सन्मान वाढवला आहे. चीनचे वर्चस्व मोडून दोन भारतीय कन्या अंतिम फेरीत पोहोचल्या आणि त्या रोमहर्षक लढतीत दिव्या हिने कोनेरू हंपी यांच्यावर विजय मिळवला. नागपूरच्या कन्येची ही ऐतिहासिक कामगिरी सर्वांसाठी अभिमानाची असून लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, म्हणून राज्य शासनाने हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
सातव्या वर्षी बुद्धिबळाचा हा प्रवास सुरू करून दिव्याने एकेक शिखरे पादाक्रांत करत सातत्याने प्रगती केली. प्रशिक्षकांची मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा आणि सर्वांचा आशीर्वाद यामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. दिव्याच्या योगदानामुळे नागपूर आणि महाराष्ट्र बुद्धिबळ विश्वामध्ये सन्मानाने ओळखले जात असल्याचा गौरव त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही जाहीर केले. क्रीडा क्षेत्रासाठी पोषण, प्रशिक्षक, फिजिओथेरपीसह आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण व्यवस्था राज्य सरकार तयार करत आहे. यासोबतच खेळाडूंच्या विकासासाठी विविध माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ परिणय फुके, ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचे आई-वडील व इतर मान्यवर उपस्थित होते.