
आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते राजन काबरा यांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यावतीने मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत देशातून प्रथम आलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी राजन मनोज काबरा यांचा देवगिरी महाविद्यालयाच्या रविंद्रनाथ टागोर सभागृहात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सीए परीक्षेत अभूतपूर्व यश मिळविलेल्या राजन काबरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळेल यासाठी विद्याथ्यांनी आपले पूर्णत्व देणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच ११वी, १२ वी बरोबरच सीएचा फाउंडेशन कोर्स करून माइंड सेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक कॉमर्स शाखेची निवड करुन सातत्यपूर्ण अभ्यास केला व सोशल मीडियाच्या आहारी न जाता माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे मला हे यश संपादन करता आले. याप्रसंगी आरजे अभय गायकवाड यांनी सीए राजन मनोज काबरा यांची मुलाखत घेवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अचूक आणि नेमके उत्तरे दिली.
याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत राजनने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद असून सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकरिता नक्कीच प्रेरणा देणारे आहे. राजनच्या या घवघवीत यशामुळे देवगिरी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून महाविद्यालयासाठी ही नक्कीच भूषणावह बाब असल्याचे सांगत आमदार सतीश चव्हाण यांनी राजन काबरा यांना पुढील वाटचालीस दिल्या.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी महाविद्यालयाची वैभवशाली परंपरा सांगून खऱ्या अर्थाने देवगिरी महाविद्यालयाने अगणित विद्यार्थी घडविण्याचे कार्य सातत्याने पार पाडले आहे असे प्रतिपादन केले याप्रसंगी सीए रोहन आचलिया व सीए मनोज काबरा यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, जेईई नीटचे संचालक प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य उपप्राचार्य प्रा विजय नलावडे, सुवर्णा काबरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अभय गायकवाड यांनी केले तर पर्यवेक्षक प्रा डी एल हिवरे यांनी आभार मानले.