
शतकवीर जो रूट आणि हॅरी ब्रूकची १९५ धावांची भागीदारी निर्णायक
लंडन : जो रुट (१०५) आणि हॅरी ब्रूक (१११) यांच्या शानदार शतकांच्या बळावर इंग्लंड संघाने ओव्हल कसोटी सामना रोमांचक बनवला आहे. पावसाने व्यत्यय आणला तेव्हा इंग्लंडने सहा बाद ३३९ धावा काढल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी केवळ ३५ धावांची आवश्यकता आहे.
इंग्लंड संघाने चौथ्या दिवशी शानदार फलंदाजी केली. बेन डकेट व कर्णधार ऑली पोप या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. बेन डकेट ५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑली पोप २७ धावांवर तंबूत परतला.
तीन बाद १०६ धावा अशा स्थितीत जो रूट व हॅरी ब्रूक या जोडीने चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. हॅरी ब्रूक याने ९८ चेंडूत १११ धावा फटकावल्या. ब्रूक याला सिराज याने १९ धावांवर जीवदान दिले होते आणि हे जीवदान भारतीय संघाला प्रचंड महागात पडले. अखेर सिराज याने झेल घेऊन ब्रूकला तंबूत पाठवले. परंतु, तोपर्यंत भारताचा पराभव निश्चित झाला होता. जो रुट याने १५२ चेंडूत १०५ धावा काढल्या. या मालिकेतील रुटचे हे तिसरे शतक आहे. त्याने १२ चौकार मारले. खराब हवामानामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ७६.२ षटकात सहा बाद ३३९ धावा काढल्या होत्या. जेमी स्मिथ (२), जेमी ओव्हरटन (०) हे खेळत होते. प्रसिद्ध कृष्णा याने १०९ धावांत तीन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने ९५ धावांत दोन बळी टिपले. आकाश दीपने १ विकेट घेताना ८५ धावा दिल्या.

ब्रुकने फक्त ९१ चेंडूत शतक झळकावले
हॅरी ब्रुकने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात फक्त ९१ चेंडूत शतक झळकावले, जलद गतीने धावा काढल्या. यासह, तो इंग्लंडसाठी भारताविरुद्ध कसोटी शतक झळकावणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. त्याच्या पुढे जेमी स्मिथ (८० चेंडू) आणि बेन डकेट (८८ चेंडू) आहेत.
रोहित आणि गिलची बरोबरी
हॅरी ब्रुकने पाचव्या कसोटी सामन्यात ९८ चेंडूत १११ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि दोन षटकार निघाले. त्याची विकेट आकाश दीपने घेतली. ब्रुकचे हे जागतिक कसोटी अजिंक्यपदातील ९ वे शतक आहे. यासह, त्याने रोहित शर्मा आणि शुभमन गिलची बरोबरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी WTC मध्ये प्रत्येकी ९ शतकेही झळकावली.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे
हॅरी ब्रुकने २०२२ मध्ये इंग्लंड संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो इंग्लंडच्या फलंदाजी क्रमात एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. आतापर्यंत त्याने ३० कसोटी सामन्यांमध्ये एकूण २८२० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १० शतके आणि १३ अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत. त्याने कसोटीत त्रिशतकही केले आहे आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या ३१७ धावा आहे.
जो रुटचे भारताविरुद्ध १६वे शतक
जो रूटने १३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १२ चौकार निघाले. रूटने या सामन्यात इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले आहे. भारताविरुद्धच्या कसोटीतील जो रूटचे हे १३ वे शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध रूटचे हे १६ वे शतक आहे.
यापूर्वी, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत ५०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे एव्हर्टन वीक्स, पाकिस्तानचे झहीर अब्बास, पाकिस्तानचे युनूस खान, वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स आणि ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टिंग यांनी केला होता. या सर्व दिग्गजांनी भारताविरुद्ध कसोटी मालिकेत दोनदा ५०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता रूटने या सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. रूटने भारताविरुद्ध तीन वेळा ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.