
नागपूर ः विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पंच पवन हलवणे यांनी बीसीसीआय पंचांच्या परीक्षेत २०२५ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. अकोल्याचे रहिवासी असलेले पवन हलवणे यांनी १४७.५ गुण मिळवले आणि परीक्षेत बसलेल्या १४१ उमेदवारांपैकी गुणवत्ता यादीत त्यांना प्रथम स्थान मिळाले. गुणवत्ता यादीतील फक्त २६ जणांना बीसीसीआयने उत्तीर्ण घोषित केले.
व्हीसीएचे आणखी एक पंच विक्रांत देशपांडे यांनी १३० गुण मिळवून बीसीसीआय पॅनेलमध्ये स्थान मिळवले. व्हीसीएचे पंच शशांक मानवतकर यांनी १२९.५ गुण मिळवून २७ वे स्थान मिळवले. बीसीसीआय मॅच रेफरींच्या परीक्षेत, व्हीसीएचे सोनिया राजोरिया आणि नामा खोब्रागडे अनुक्रमे गुणवत्ता यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. महिला विभागात पहिले व्हीपीटीएल विजेतेपद जिंकणाऱ्या ऑरेंज टायग्रेसेस संघाच्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या राजोरिया यांनी परीक्षेत १०० पैकी ८३.५ गुण मिळवले तर खोब्रागडे यांनी ८१.५ गुण मिळवले. व्हीसीएतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.