
फ्लोरिडा ः वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लॉडरहील फ्लोरिडामध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने शानदार फलंदाजी केली, त्याने शानदार अर्धशतक झळकावले.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, विंडीज संघ २० षटकांत ४ गडी गमावून केवळ १७६ धावा करू शकला. पाकिस्तानने ही तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशी जिंकली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर साहिबजादा फरहान आणि सॅम अयुब यांनी संघाला उत्तम सुरुवात दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी झाली. फरहानने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. सॅम अयुबने ४९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा केल्या. याशिवाय हसन नवाजने १५, खुशदिल शाहने ११ आणि फहीम अश्रफने १० धावांचे योगदान दिले. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी मिळून एकूण ११ षटकार मारले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, रोस्टन चेस आणि शमार जोसेफ यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवातही चांगली झाली. ४४ धावांच्या धावसंख्येवर, संघाला पहिला धक्का ज्वेल अँड्र्यूच्या रूपात बसला, तो १५ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विंडीजचा कर्णधार शाई होप काही खास करू शकला नाही आणि ९ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथानाझे आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी अर्धशतके झळकावली. अथानाझेने ४० चेंडूत ६० धावा केल्या तर रदरफोर्ड ३५ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. पण दोघांच्याही या खेळीमुळे संघ विजयी होऊ शकला नाही. शेवटी, या सामन्यात वेस्ट इंडिजला १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज, हसन अली, हरिस रौफ, सॅम अयुब आणि सुफियान मुकीम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.