
छत्रपती संभाजीनगर ः स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवत घवघवीत यश संपादन केले.
डॉ प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २००९ पासून बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धेचे सलग १६ वे वर्ष आहे. जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. लहान मुलांसाठी ड्रिबल आणि शूटींग स्पर्धा आयोजित केली होती. तसेच १०, १२, १४, १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात ३×३ बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १० वर्ष वयोगटात मुलांच्या गटात प्रथम स्वाभिमान क्रीडा मंडळ (अ) तर द्वितीय वोखार्ट ग्लोबल स्कूल संघ ठरला. या संघात बेस्ट प्लेअर म्हणून पवन थोरात याने पारितोषिक मिळवले.
१२ वर्ष वयोगटात मुलांच्या गटात प्रथम स्वाभिमान क्रीडा मंडळ (अ), द्वितीय स्वाभिमान क्रीडा मंडळ (ब) यांनी यश संपादन केले. बेस्ट प्लेअर पुरस्कार मान अग्रवाल याने मिळवला. १२ वर्ष वयोगटात मुलींच्या गटात प्रथम स्वाभिमान क्रीडा मंडळ आणि द्वितीय समर्थ इंडियन बास्केटबॉल अकॅडमी यांनी यश मिळवले. बेस्ट प्लेअर पुरस्कार श्रेया धाराशिवकर हिने पटकावले. १४ वयोगटात मुलांच्या गटात प्रथम बॉबी बॉईस क्लब आणि द्वितीय स्वाभिमान क्रीडा मंडळ या संघांनी यश मिळवले. या गटात अजिंक्य म्हस्के हा उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. १४ वर्ष वयोगटात मुलींच्या गटात प्रथम स्वाभिमान क्रीडा मंडळ आणि द्वितीय समर्थ इंडियन बास्केटबॉल अकॅडमी या संघांनी पारितोषिक जिंकले. या गटात बेस्ट प्लेअर पुरस्कार माही कोहली हिने संपादन केला.
१७ वर्ष वयोगटात मुलांच्या गटात प्रथम पोलीस बॉईज क्लब आणि द्वितीय बॉबी बॉईज क्लब यांनी यश संपादन केले. या गटात बेस्ट प्लेअर पुरस्कार पवन पावले याला देण्यात आले. १७ वर्ष वयोगटात मुलींच्या गटात प्रथम समर्थ इंडियन बास्केटबॉल अकॅडमी आणि द्वितीय स्वाभिमान क्रीडा मंडळ या संघांनी पारितोषिक पटकावले. या गटात बेस्ट प्लेअर पुरस्कार विहा जैन हिला देण्यात आला.
पारितोषिक वितरण
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी स्वाभिमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष जीवन रौंदळ तसेच स्कोडा कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजेश आंधळे, डॉ विश्वेस बन्सल, निशांत सर, डॉ प्रफुल्ल जटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्वाभिमान क्रीडा मंडळाचे क्रीडा विभाग प्रमुख पंकज परदेशी, आरती परदेशी तसेच एनआयएस कोच सचिन परदेशी, स्पर्धा प्रमुख समाधान बेलेवार, पंच कमेटी प्रमुख आकाश टाके, स्पर्धा शिस्त प्रमुख विजय मोरे आणि राहुल शिंदे, पंच धनंजय कुसाळे, सौरभ गाडेकर, सुरज कदम आदींनी पुढाकार घेतला होता. स्पर्धेचे सूत्रसंचालन दिनेश जायभाये यांनी केले.