
पुणे ः टेबल टेनिस खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविताना मला वेगवेगळ्या कौशल्य गुणांचा उपयोग झाला. आजही एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना हेच गुण मला उपयोगी पडत असतात असे बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ उदय भालचंद्र यांनी सांगितले.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या संवाद या व्याख्यान मालिकेंतर्गत ‘टेबल टेनिसपटू ते व्यवस्थापकीय संचालक’ या प्रवासातील विविध पैलू डॉ उदय भालचंद्र यांनी स्पष्ट केले. वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ विनय चाटी हे अध्यक्षस्थानी होते.

क्रीडा क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्रात असतात आत्मविश्वासाखरीच तुम्हाला यश मिळत नाही. इतर कोणत्याही क्षेत्रात काम करताना आवश्यक असणारा आत्मविश्वास तुम्हाला क्रीडा क्षेत्रात अधिक परिणामकारकरीत्या मिळू शकतो असे सांगून डॉ उदय भालचंद्र पुढे म्हणाले,” टेबल टेनिस खेळताना मला अनेक वेळा माझ्यापेक्षा अनुभवाने आणि मानांकनांमध्ये वरिष्ठ असलेल्या खेळाडूंविरुद्ध सामने खेळण्याची संधी मिळाली. प्रतिस्पर्धी किती तुल्यबळ असला तरी आपण त्याला पराभूत करू शकतो असा जर आत्मविश्वास ठेवला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकते. त्यामुळेच अशा मातब्बर खेळाडूंवर मी विजय मिळवू शकलो होतो.आजही आमच्या कंपनीसमोर अनेक आव्हाने असतात. या आव्हानांना मी अतिशय आत्मविश्वासानेच सामोरे जाऊ शकतो आणि पर्यायाने आमच्या कंपनीला यश मिळवून देतो. “
उदय भालचंद्र पुढे म्हणाले,” आमचा खेळ जरी वैयक्तिक क्रीडा प्रकार असला तरी आंतर महाविद्यालयीन, आंतर विद्यापीठ अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दुहेरीचे सामने खेळताना तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवावा लागतो तर तरच तुम्हाला यश मिळू शकते. तसेच सांघिक विभागाच्या लढती खेळताना असा समन्वय महत्त्वाचा असतो. आजही कंपनीसमोर असलेली उद्दिष्टे अन्य सहकाऱ्यांसमवेत साकार करताना मला खेळातील नेतृत्व शैली, समन्वय अशा अनेक गुणांचा फायदा होत असतो. “
कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी जेव्हा पाच सहा उमेदवार असतात आणि या उमेदवारांमध्ये एखादा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू असेल तर निश्चितपणे मुलाखतीच्या वेळी त्याला झुकते माप दिले जाते हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्यातरी क्रीडा प्रकारात भाग घेतला पाहिजे जेणेकरून त्याला या क्षेत्रात मिळविलेले यश नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी निश्चितपणे उपयोगी पडू शकते. जीवनात येणाऱ्या अपयशांना समर्थपणे कसे सामोरे जायचे हे खेळाद्वारे आपल्याला शिकायला मिळते, असेही डॉ उदय भालचंद्र यांनी सांगितले.
केतकी गोरे-उत्पात यांनी स्वागत केले तर श्वेता सरदेसाई यांनी आभार मानले. यावेळी प्रा ज्योती कपूर, प्रा संतोष गोगले, प्रा संयोग इंगळे व मानद व्याख्याते डॉ मिलिंद ढमढेरे उपस्थित होते.