
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण
अमरावती ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोर्शी, अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सुरू होणारे चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल तसेच रोजगारनिर्मितीस मदत होईल.
आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की मासेमारी केवळ समुद्रातच होते, मात्र प्रत्यक्षात देशातील सुमारे ४० टक्के मासेमारी गोड्या पाण्यातून होते. पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. आता शेती आणि फलोत्पादनासोबतच पशुपालन व मत्स्यपालन या क्षेत्रांचेही महत्त्व वाढले आहे. राज्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवांना मदत मिळावी, त्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, मासेमारीच्या नव्या संकल्पना विकसित व्हाव्यात आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत काम केले जात आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा वापर करून मत्स्यपालन सुरू केले असून त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नीलक्रांती’ संकल्पनेतून प्रेरणा घेत मत्स्य व्यवसायाला आता कृषी क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यपालनासाठी शेतीच्या दराने कर्ज उपलब्ध होईल तसेच किसान क्रेडिट कार्डसह इतर सुविधांचाही लाभ मिळेल.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. अमरावती जिल्ह्यातील गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत केली जाणार आहे. पंढरी मध्यम प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे २३ हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. ‘पीएम मित्र योजने’अंतर्गत अमरावती जिल्ह्यात दुसरे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असून या माध्यमातून २ लाखांहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या पार्कमुळे मोठा फायदा होणार आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रविण तायडे, आमदार प्रताप अडसड, आमदार केवलराम काळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार अनुराधा चव्हाण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ नितीन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.