
खेळाडूंना तीन कागदपत्रे सादर करणे अनिवार्य ः सुधीर मोरे
पुणे ः विविध स्तरावर शालेय आणि इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून योग्य कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित खेळाडूचे वय किमान पाच वर्षांपर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला, खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत आणि आधार कार्ड या तीन गोष्टी अत्यंत गरजेच्या असणार आहेत.
राज्यात भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा स्पर्धा, सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा तसेच नेहरू हॉकी स्पर्धांचे आयोजन विविध स्तरावर करण्यात येते. सदर स्पर्धांचे आयोजन हे ११, १४, १५, १७ व १९ वर्ष वयोगटामध्ये करण्यात येते.
सदर स्पर्धेमध्ये अधिक वयाचे खेळाडू, वय कमी केलेली कागदपत्रे तथा वयाबाबतचे पुरावे सादर करून सहभागी होत असल्याच्या तक्रारी क्रीडा संचालनालयास प्राप्त होत होत्या. तसेच काही खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धा व एकविध खेळ संघटना पुरस्कृत क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या जन्मतारखा धारण करुन खेळल्याचे क्रीडा संचालनालयाच्या निदर्शनास आले होते. यास्तव संदर्भिय पत्रानुसार, संबंधित खेळाडूचे वय पाच वर्षांपर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला किंवा खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत, आधार कार्ड किंवा पासपोर्ट ही कागदपत्रे अनिवार्य करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. तथापी, अद्यापही काही खेळाडू बोगस कागदपत्रांच्या आधारे वय कमी करुन शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
सन २०२५-२६ पासून भारतीय शालेय खेळ महासंघाने, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंना वयनिश्चितीसाठी एज व्हेरिफिकेशन टेस्ट अनिवार्य केली असून त्याबाबत जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा व शैक्षणिक संस्थाना अवगत करावे. तसेच सन २०२५-२६ पासून तालुका ते राज्यस्तरापर्यंत आयोजित होणाऱया शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी संबंधित खेळाडूंचे वय किमान ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला, खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत व आधार कार्ड या सर्व कागदपत्रांची गरज आहे आणि ही सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात येत आहे, अशी माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी एका पत्राद्वारे दिली आहे.