
२०३० च्या यजमानपदाचे हक्क मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न
अहमदाबाद ः राष्ट्रकुल क्रीडा संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल क्रीडा अधिकाऱ्यांचे एक पथक मंगळवारपासून तीन दिवसांसाठी अहमदाबादला भेट देत आहे. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची भारताची शक्यता वाढत असल्याने ही टीम ठिकाणांची पाहणी करेल आणि गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे.
राष्ट्रकुल क्रीडा अधिकाऱयांचे पथक रविवारी राष्ट्रीय राजधानीत पोहोचले आणि मंगळवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. भारताला यजमानपदाचे अधिकार मिळाल्यास अहमदाबाद हे प्रस्तावित यजमान शहर आहे. या घडामोडींशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हो, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा (पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा महासंघ म्हणून ओळखला जाणारा) एक संघ नवी दिल्लीत आहे आणि ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान अहमदाबादला भेट देईल.”
पाहुण्या संघाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अधिकाऱ्यांची येथे भेट घेतली. अधिकाऱ्याने सांगितले की, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे एक मोठे शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस भेट देईल.” गेल्या महिन्यात कॅनडाने बोली लावण्याच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भारताच्या २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताने इरादा पत्र सादर केले आहे आणि अहमदाबादची यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी देशाला अंतिम बोलीसाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत यजमान देशाचा निर्णय घेतला जाईल.